पवना नदीवर बंधाऱ्यांना जलसंपदा विभागाची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 09:01 PM2018-04-26T21:01:47+5:302018-04-26T21:01:47+5:30
सध्याच्या स्थितीत ४९० एमएलडी पाणी महानगरपालिका रावेत बंधाऱ्यातुन उचलते. या बंधाऱ्यालगत नव्याने बंधारा बांधण्याच्या संदर्भात महानगरपालिकेने जलसंपदा विभागाकडे परवानगी मागितली होती.
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. रावेत येथील बंधाऱ्याचे आयुर्मान संपल्याने त्या शेजारी नवीन बंधारा बांधण्यास जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे. पवना प्रकल्प बंद जलवाहिनी योजनेच्या अंतर्गत उर्से व शिवणे या ठिकाणी कोल्हापुर पध्दतीची बंधारे बांधण्यासही मंजूरी दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. सध्याच्या स्थिती त ४९० एमएलडी पाणी पिंपरी चिंचवड महानगपालिका रावेत बंधाऱ्यातुन उचलते. या बंधाऱ्यालगत नव्याने बंधारा बांधण्याच्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने २०१३ मध्ये जलसंपदा विभागाकडे परवानगी मागितली होती. जलसंपदा विभागाने यास परवानगी दिली नव्हती. तसेच पवना प्रकल्प बंद पाईप लाईन योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र जलसंपदा नियम प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार उर्से व शिवणे या ठिकाणी कोल्हापुर पध्दतीचे बंधारे बांधावेत या संदर्भात तत्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी केली होती.
या प्रश्नासंदर्भात झालेल्या मुंबई येथील बैठकीस जलसंपदामंत्री विजय शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, महानगरपालिकेचे सहशहर अभियंता पाणी पुरवठा व जलनिसरण विभागाचे रविंद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा रामदास तांबे उपस्थित होते.
महापालिकेला पवना धरणातुन पाणी पुरवठा केला जातो. पवना प्रकल्प बंद पाईप योजनेचे काम पूर्ण बंद पडले आहे. पिंपरी चिंचवड शहराला रावेत बंधारा येथून पाणी उचलत पाणीपुरवठा केला जातो. एक दिवस पुरेल एवढाच पाण्याचा साठा या बंधाऱ्यावर उपलब्ध असतो. रावेत बंधारा ब्रिटीश काळातील असुन १०० वर्षांपेक्षा जास्त दिवस या बंधाऱ्याला झाले आहेत. जलसंपदा विभागाच्या निकषानुसार या बंधाऱ्याची वयोमर्यादा संपली आहे. बंधाऱ्यालगत नवीन बंधारा बांधण्यासाठी महानगरपालिका २०१३ पासुन पाठ पुरावा करत आहे. मात्र, जलसंपदा विभागाने परवानगी दिलेली नाही. खासदार बारणे म्हणाले, नव्याने बंधारा बांधण्यास परवानगी दिली आहे. तसेच उर्से व शिवणे येथे कोल्हापुर पद्धतीचे बंधारे बांधुन पाणी साठवण करणार असुन त्याचा शेतीलाही उपयोग होईल. हा बंधारा बाधण्यासाठी जलसंपदा विभागाकडुन अंदाज पत्रक महापालिकेकडे आठ दिवसात सादर करण्यात येणार आहे.