पाणीवापरावर पुन्हा घसरले जलसंपदामंत्री, काटकसरीचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 04:24 AM2018-05-06T04:24:20+5:302018-05-06T04:24:20+5:30
माणशी १५५ लिटर पाणी योग्य आहे. पुणेकरांना मात्र माणशी ३३५ लिटर पाणी मिळते. महापालिकेला ११.५० टीएमसी पाणी उचलण्यास मंजुरी आहे; प्रत्यक्षात मात्र १७.५० टीएमसी पाणी घेतले जाते, अशी टीका करीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा पुणेकरांना पाण्यावरून टोकले.
पुणे - माणशी १५५ लिटर पाणी योग्य आहे. पुणेकरांना मात्र माणशी ३३५ लिटर पाणी मिळते. महापालिकेला ११.५० टीएमसी पाणी उचलण्यास मंजुरी आहे; प्रत्यक्षात मात्र १७.५० टीएमसी पाणी घेतले जाते, अशी टीका करीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा पुणेकरांना पाण्यावरून टोकले.
भविष्यात पाण्यावरून युद्धे होणार आहेत; त्यामुळे आतापासूनच पाणी जपून वापरा, असा सल्लाही त्यांनी दिला. महापालिकेने पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात उभारलेल्या ५०० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण महाजन यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थानिक नगरसेवक शंकर पवार, अनिता कदम तसेच अन्य नगरसेवक, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली आदी या वेळी उपस्थित होते.
वॉटर आॅडिट करण्याची गरजही महाजन यांनी या वेळी व्यक्त केली. शुद्ध पाणी देणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. त्यामुळे हे जलशुद्धीकरण केंद्र पुणेकरांची शुद्ध पाण्याची गरज भागविणार, हे चांगलेच आहे. मात्र, त्याचबरोबर पाणी वाचविण्यासाठीचे सर्व उपायही महापालिकेने करावेत, अशी अपेक्षा महाजन यांनी व्यक्त केली.
महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिकेच्या विविध योजनांचा आढावा घेतला. पुणेकरांना व्यवस्थित पाणी मिळवून देऊ, हे आश्वासन या केंद्राच्या माध्यमातून पूर्ण करीत आहोत; २४ तास पाणी मिळण्याच्या योजनेचाच हा एक भाग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्राच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे महापालिका, महावितरण तसेच अन्य खात्यांतील अधिकाऱ्यांचा या वेळी महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हरीश परदेशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. धेंडे यांनी आभार मानले
बेसुमार वापर थांबवायला हवा
पुणेकरांनी पाणी जपून वापरावे. बोगदा करून त्यातून खडकवासला ते पर्वती पाणी आणले, तर किमान ३ टीएमसी पाण्याची बचत होईल. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पिण्यासाठी, शेतीसाठी व मग उद्योगांसाठी, असा पाण्याचा प्राधान्यक्रम आहे. त्याप्रमाणे निर्णय घेतला तर शेतकरी नाराज होतात. त्यातून संघर्ष उभा राहतो. सुदैवाने मागील वर्षी पाऊस चांगला झाला; त्यामुळे सध्या तरी स्थिती चांगली आहे. मात्र, पाण्याचा बेसुमार वापर थांबायला हवा. - गिरीश महाजन, जलसंपदामंत्री
ंमहापौर नाशिकच्या!
महाजन यांनी बोलताना मुक्ता टिळक यांचा ‘नाशिकच्या महापौर’, तर त्यानंतर काही वेळाने सौरभ राव यांचा ‘नागपूरचे आयुक्त’ असा उल्लेख केला. दोन्ही वेळा प्रेक्षागृहात हशा झाला. दुसºया वेळी ‘पुणे-पुणे’ असे सांगत व्यासपीठावरील काहींनी दुरुस्ती केली. महाजन यांनी त्यावर ‘मी नाशिकचा पालकमंत्री असल्यामुळे नाशिकचे नाव येते व राव काही वर्षांपूर्वी नागपूरला होते; त्यामुळे त्यांचा तसा उल्लेख झाला,’ असे स्पष्ट केले.
खासदार शिरोळे यांनी, ‘पुणे महापालिकेची अनेक कामे जलसंपदाकडे आहेत. ती त्यांना मंजूर करावीत,’ अशी मागणी केली. आमदार मिसाळ यांनी, ‘पुणेकरांच्या पाण्यावर ते जास्त पाणी वापरतात म्हणून टीका होते; मात्र पाण्याची गळती किती तरी जास्त प्रमाणात होते व प्रत्यक्षात पुणेकरांना अपेक्षित पाणी मिळतच नाही,’ असे सांगितले. भिमाले यांनी नदीकाठसंवर्धन तसेच महापालिकेच्या अन्य काही योजनांसाठी जलसंपदाचे ना हरकत प्रमाणपत्र हवे आहे, ते महाजन यांनी मिळवून द्यावे, अशी मागणी केली.