पाणीटंचाईचा महापालिकेला विसर

By Admin | Published: October 24, 2015 04:45 AM2015-10-24T04:45:21+5:302015-10-24T04:45:21+5:30

शहरात पाणीकपात लागू करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असतानाही पाण्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गाड्या धुण्यासाठी, बांधकामासाठी

The water scarcity Municipal Corporation forgot | पाणीटंचाईचा महापालिकेला विसर

पाणीटंचाईचा महापालिकेला विसर

googlenewsNext

पुणे : शहरात पाणीकपात लागू करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असतानाही पाण्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गाड्या धुण्यासाठी, बांधकामासाठी, वॉशिंग सेंटरमध्ये पाण्याचा गैरवापर होत आहे. तसेच पाणीगळती, पाण्याच्या टाक्या भरून वाहणे असे प्रकारही मोठ्या प्रमाणात सुरू असताना महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली कारवाई थंडावली आहे.
यंदा पाऊस कमी झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा झाला आहे. या पार्श्वभूमीवर, शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात ३० टक्के पाणीकपात करण्यात आली. त्याचबरोबर शहरातील सर्व खासगी व सार्वजनिक जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर बंद करण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी काढले आहेत. पिण्याचा पाण्याचा गैरवापर झाल्यास, साठवण टाक्या भरून पाणी वाया गेल्यास, रस्त्यावर पाणी टाकल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे तसेच नळजोड तोडण्याचेही आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. इमारत निरीक्षक, पेठ निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व अतिक्रमण निरीक्षक यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पाण्याचा गैरवापर होत असल्यास ०२०-२५५०१३८३/२५५०१३८६ या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रारी करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले होते. त्यानुसार हेल्पलाइनवर पाण्याच्या गैरवापराच्या असंख्य तक्रारी नागरिकांनी केल्या. त्यानुसार, २०४ जणांवर दंडात्मक कारवाई करून १ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा दंड पालिकेने वसूल केला. मात्र, काही दिवसांपासून पालिकेची कारवाई थंडावली आहे. शहरातील अनेक वॉशिंग सेंटर बेकायदेशीरपणे सुरू आहेत. बांधकामांसाठीही पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.
पाणीकपात लागू केल्यानंतर काही दिवस गांभीर्याने पाण्याच्या गैरवापराकडे लक्ष देण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट यांनी गैरवापर करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर काही वॉशिंग सेंटर व नागरिकांवर कारवाईही करण्यात आली. मात्र, पाणीकपात लागू करून दोन महिने उलटल्यानंतर पाण्याच्या गैरवापराकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा हा जुलै २०१६पर्यंत पुरवावा लागणार आहे. उन्हाळ्यामध्ये राज्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्यांना पाणी पुरविण्याची जबाबदारीही पुण्याला उचलावी लागणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)

महापालिकेकडूनच पाण्याची नासाडी
हडपसर आकाशवाणी केंद्राजवळ महापालिकेची पाण्याची टाकी आहे. आठवड्यातून अनेक वेळा ही टाकी भरून हजारो लिटर पाणी वाया जाते.
पाण्याचा थोडासाही गैरवापर केल्यास दंडात्मक कारवाई केली जात असताना हजारो लिटर पाणी वाया घालविणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

शहरात ३० टक्के पाणीकपात
यंदा पाऊस कमी झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात ३० टक्के कपात केली आहे.

२०४ जणांवर दंडात्मक कारवाई
पाण्याच्या गैरवापराच्या असंख्य तक्रारी नागरिकांनी केल्या. त्यानुसार, २०४ जणांवर दंडात्मक कारवाई करून १ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल.

Web Title: The water scarcity Municipal Corporation forgot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.