यवत परिसरत पाण्याची टंचाईची चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:15 AM2021-02-17T04:15:47+5:302021-02-17T04:15:47+5:30

---- यवत : यवत परिसरात यंदाच्या पावसाळ्यात विक्रमी पाऊस झाल्यानंतर व उन्हाळ्याची चाहूल अद्याप लागली नसतानाही पाणीटंचाई निर्माण झाली ...

Water scarcity in Yavat area | यवत परिसरत पाण्याची टंचाईची चाहूल

यवत परिसरत पाण्याची टंचाईची चाहूल

Next

----

यवत : यवत परिसरात यंदाच्या पावसाळ्यात विक्रमी पाऊस झाल्यानंतर व उन्हाळ्याची चाहूल अद्याप लागली नसतानाही पाणीटंचाई निर्माण झाली असून बहुतांश विहिरींची पाणी पातळी कमालीची खालावली आहे.

यवत गावात नागरिकांना पाणीपुरवठा करणारे पाण्याचे स्राेत खालावल्याने पाणी पुरवठा करतांना ग्रामपंचायत यंत्रणेची तारांबळ उडत आहे.

फेब्रुवारी महिन्यातील दुसरा आठवडा कसा बसा गेला आहे. अजून तर उन्हाळा सुरू होणे बाकी आहे. असे असताना गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने सगळेच चक्रावून गेले आहेत. यंदा विक्रमी पाऊस झाल्याने पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी आशा सर्वांनाच होती. मात्र पाण्याचा भरमसाठ वाढलेला वापर, अमर्याद कूपनलिका यामुळे भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खालावल्याचा प्रत्यय यंदा आला आहे.

नवीन मुठा उजवा कालवा व जुना कालवा दोन्ही सध्या बंद असल्याने परिसरातील शेतीला देखील पाणी कमी पडू लागले आहे. आणखी काही दिवस नवीन मुठा कालव्यातून आवर्तन सुरू न झाल्यास तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

सद्य परिस्थितीत यवत गावात एक दिवसाआड नळाला पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु दिवसेंदिवस गावात पाणीपुरवठा करणारे स्रोत आटत चालल्याने पाणी टंचाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे गावातील ग्रामपंचायत निवडणूक होऊन नवीन पदाधिकारी आलेले असताना गावात पहिल्याच आठवड्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने त्यांची डोके दुःखी वाढणार आहे.

गावाला पाणीपुरवठा करताना महत्त्वाची असलेली माटोबा तलाव येथील विहिरीला पाणी प्रचंड कमी झाले आहे. ग्रामपंचायत मागे असलेला पाणी साठवण तलाव कोरडा ठाक पडला आहे. सद्य परिस्थितीत यवत स्टेशन येथील बाहेती विहीर, जुन्या तलाठी कार्यालय नजीक व गांधी हॉस्पिटल लगत असलेला बोअरवेल सुरू असून संपूर्ण गावाला केवळ एवढ्या पाणी स्रोतांमधून पाणी पुरवणे जिकिरीचे ठरत आहे.

--

चौकट :

यवतच्या शहरीकरणाचा दुष्परिणाम

यवत व परिसरात शहरीकरण होत आहे. यवतसह आजूबाजूची सर्व गावे पीएमआरडीएमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. भविष्यात वाढत्या लोकसंख्येबरोबर येथील पाण्याच्या शाश्वत योजनेचा विचार आताच प्रशासनाने करणे गरजेचे आहे. अन्यथा नवीन मुठा कालव्याचे पाणी बंद झाल्यानंतर सर्वच गावांमध्ये उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई कायम जाणवू शकते.

--

फोटो क्रमांक :

फोटो ओळ :- खडकवासला धरण साखळीत मुबलक पाणीसाठा असताना देखील कोरडा पडलेला नवीन मुठा उजवा कालवा.

Web Title: Water scarcity in Yavat area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.