Heavy Rain: पुणे स्टेशन परिसरात शिरले पाणी; स्थानकांवरील रूळ पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 09:52 PM2021-10-04T21:52:53+5:302021-10-04T22:05:09+5:30
स्थानकावरील अनेक विभागाच्या कार्यालयात देखील पाणी शिरल्याने कर्मचाऱ्यांची देखील गैरसोय झाली
पुणे: पुण्यात सोमवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसानी पुणेकरांची दैना उडवली. याचा फटका रेल्वे प्रवाशांना देखील बसला. पुणे स्थानकावरील फलाट १ हा पाण्याखाली गेला. फलाट एकवरची पाण्याची पातळी ३ते ४ फूट इतकी होती. तर अम्ब्रेला गेट मध्ये देखील सर्वत्र पाणीचपाणी होते. प्रवाशांना आपल्या बॅगा पाण्यातून घेऊन जाव्या लागल्या. स्थानकावरील अनेक विभागाच्या कार्यालयात देखील पाणी शिरल्याने कर्मचाऱ्यांची देखील गैरसोय झाली.
पुण्यात संध्याकाळी पाऊस सुरु झाल्या नंतर स्थानक परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली. पावसाचा जोर वाढल्या नंतर रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाली. रुळावर जवळपास तीन फूट इतके पाणी होते. याचा कोणताही परिणाम वाहतुकीवर झाला नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. मात्र काही गाड्या ह्या मेन लाईन ने काढण्यात आल्या.
फलाट एक वरील मेडिकल स्टोअर्स, पार्सल ऑफिस, आदी ठिकाणे देखील पाण्याखाली गेले होते. पार्सल ऑफिस मध्ये पाणी गेल्याने तेथील वस्तू भिजू नयेत यासाठी कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागली. दोन वर्षा पूर्वी देखील असा प्रकार घडला होता. मात्र रेल्वे प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना आखल्या जात नसल्याने प्रवाशांना फटका बसत आहे.