पाणीटंचाई : ८ गावे, ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणी; डोक्यावरचा हंडा उतरेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 02:58 AM2018-05-27T02:58:17+5:302018-05-27T02:58:17+5:30
जुन्नर तालुक्यात ५ धरणे असतानाही प्रत्येक वर्षी आदिवासी पट्ट्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो़ या वर्षी ८ गावे आणि ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ आदिवासी पट्ट्यातील विंधनविहिरींची पातळी नीचांकी झालेली आहे़
नारायणगाव - जुन्नर तालुक्यात ५ धरणे असतानाही प्रत्येक वर्षी आदिवासी पट्ट्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो़ या वर्षी ८ गावे आणि ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ आदिवासी पट्ट्यातील विंधनविहिरींची पातळी नीचांकी झालेली आहे़ ज्या भागात पाणी नाही, त्या भागात महिलांना कित्येक किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागते. दर वर्षी हा प्रश्न निर्माण होत असल्याने आदिवासी भागातील पाणीप्रश्न कधी संपुष्टात येणार व महिलांच्या डोक्यावरील हांडा कधी खाली येणार, अशी अपेक्षा आदिवासी बांधव करीत आहेत.
जुन्नर तालुक्यातील ६५ गावे आदिवासी भागात आहेत़ पश्चिम पट्ट्यात असलेल्या या गावांमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे़ माणिकडोह व पिंपळगाव जोगा धरण ही आदिवासी पट्ट्यालगत येतात; परंतु आदिवासी पट्टा उंच भागात असल्याने या धरणांमधून पाणी नेणे मुश्कील आहे़ या भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आदिवासी भागात जलसंधारण योजना, केटीवेअर, पावसाचे पाणी बोअरवेल घेऊन त्याच भागात सोडणे आवश्यक आहे. अनेक वर्षांपासून आदिवासी पट्ट्यामध्ये उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो़ या वर्षी तालुक्यातील आणे, नळावणे, शिंदेवाडी, जवळवंडी, अजनावळ, आलमे, गावठाण, पिंपळगाव जोगा, आळू, डिंगोरे, घोडमाळ या गावांसह आजूबाजूच्या ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ या भागात दररोज ४ टँकर, तर कोपरे मांडवे या भागात ३ टॅक्टरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या गावांव्यतिरिक्त सुकाळ वेढे, हातवीज, आंबे या आदिवासी गावांत; तर गुळुंचवाडी गावासाठी टँकरची मागणी प्रस्तावित आहे, अशी माहिती पंचायत समितीचे यांत्रिकी विभागप्रमुख आत्माराम कसबे यांनी दिली़
पाणीपुरवठा योजनांची चौकशी करावी
आदिवासी भागातील जवळपास ६० टक्के पाणीपुरवठा योजना बंद अवस्थेत आहेत. काही पाणीपुरवठा योजना ठेकेदारांनी पूर्णच केलेल्या नाहीत. मात्र, त्याची बिले अधिकाऱ्यांशी संगनमत करून काढून घेण्यात आलेली आहेत. काही पाणीपुरवठा योजना देखभालीअभावी बंद पडलेल्या आहेत़ पंचायत समितीच्या आढावा बैठकीत सर्वांत जास्त पश्न पाणीप्रश्नासंदर्भात उपस्थित करण्यात आले होते़
लोकांच्या रोशाला सामोर जाऊ शकत नसल्याने अनेक अधिकारी या बैठकांना दांड्या मारत आहेत़ आदिवासी भागात झालेल्या सर्व पाणीपुरवठा योजनांची चौकशी करावी, गैरप्रकार झाला असेल तर संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी महासंघ जुन्नरचे अध्यक्ष तुकाराम रावते यांनी केली आहे़
टँँकरची पाहावी लागते वाट
जुन्या काळातील विहिरींना पावसाळ्यात पाणी असते; मात्र उन्हाळ्यात एप्रिल, मेच्या दरम्यान विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी आटल्याने महिलांना लांब त्या ठिकाणी जाऊन पाणी आणावे लागते. तसेच, या भागातील महिलांना दररोज पाण्याच्या टँकरची वाट पाहावी लागते़ सध्याच्या परिस्थितीमध्ये आदिवासी पट्ट्यातील बहुतांश गावांमध्ये पाण्याची बिकट अवस्था निर्माण झालेली आहे़ या भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार की नाही, अशी खंत आदिवासी बांधव करीत आहेत़