भोर तालुक्यात पाणीटंचाई; ७ गावे, ३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 04:48 PM2024-05-01T16:48:22+5:302024-05-01T16:48:40+5:30
उन्हाळ्याची वाढलेली तीव्रता व पिण्याच्या पाण्याचे अटलेले स्रोत यामुळे दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत आहे
भोर : भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून, पंचायत समितीकडून ७ गावे, ३ वाड्यांना ७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तीन गावांना टँकर मंजूर आहेत. दोन गावांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. मागील वर्षी दोन टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. यावर्षी आत्ताच ७ टँकर सुरू झाले असून, यात वाढ होणार आहे.
मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट निर्माण झाली असून, पारा ४० च्या पुढे पोहोचला आहे. त्यामुळे जलस्राोत आटू लागले आहेत. विहिरी कोरड्या पडत असल्यामुळे भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून ७ गावे ३ वाड्यांना ७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. वीस गाव खोऱ्यातील वरोडी खुर्द, वरोडी, डायमुख, तर वेळवंड भागातील जयतपाडची हुंबे वस्ती यांना टँकर मंजूर झाले आहेत. मात्र टँकर अद्याप सुरू न झाल्याने जयतपाडला ग्रामपंचायतीने खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. तर पहर बुद्रुकच्या वरची धानवली आणी खालची धानवली यांच्यासाठी टँकर मागणीचा प्रस्ताव दिला आहे. कुडली खुर्द येथील विहिरीचे पाणी कमी झाले असून, पाणी खराब झाले आहे. त्यामुळे शिरवली हि. मा. ग्रामपंचायतीने शिरवली हि.मा. व कुडली खुर्द गावांना टँकर सुरू करावे म्हणून भोर पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे. टंँकर मंजूर होईपर्यंत ग्रामपंचायतीने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असल्याचे सरपंच नामदेव पोळ यांनी सांगितले.
भोर पंचायत समितीकडून नीरा-देवघर धरण भागातील रिंगरोडवरील पहर बुद्रुकची कचरे वस्ती, उंब्राटकर वस्ती, भोर-महाड रस्त्यावरील वारवंड, उंबार्डे, शिळींब, राजिवडी, नानावळे, शिंदे वस्ती येथे दररोज एक खेप याप्रमाणे पाणीपुरवठा सुरू आहे. तर महामार्गावरील ससेवाडी (२), शिंदेवाडी (४), करंदी खे. बा. (३) मोरवाडीचे पाचलिगे येथे एक, याप्रमाणे ७ टँकरने दररोज पिण्याचा पाणी पुरवठा सुरू आहे.
मागील वर्षी दोन टँकरनेच पाणीपुरवठा सुरू होता. यावर्षी मागणी वाढत चालली आहे. भाटघर धरणातील कमी झालेला पाणीसाठा नीरा- देवघर धरणातून खाली सोडलेले पाणी, उन्हाळ्याची वाढलेली तीव्रता व पिण्याच्या पाण्याचे अटलेले स्रोत यामुळे दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत आहे. भोर पंचायत समितीकडून ७ गावे ३ वाड्यांना ७ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, तीन गावांना टँकर मंजूर करण्यात आले आहे. लवकरच त्यांनाही टँकरने पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असे भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी सांगितले. भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना रानावनात पाणी शोधावे लागत आहे. अनेक ठिकाणी खराब झालेले पाणी प्यावे लागत आहे. यामुळे साथीचे आजार उद्भवू शकतात, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.