पाणीटंचाईच्या झळा तीव्र
By admin | Published: March 5, 2016 12:46 AM2016-03-05T00:46:01+5:302016-03-05T00:46:01+5:30
बारामती तालुक्यातील जिरायती भागात वाढत्या उन्हाळ्याबरोबर पाणी टंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक गावे व वाड्या-वस्त्यांमधून टँकरची मागणी पुढे येऊ लागली
लोणी भापकर : बारामती तालुक्यातील जिरायती भागात वाढत्या उन्हाळ्याबरोबर पाणी टंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक गावे व वाड्या-वस्त्यांमधून टँकरची मागणी पुढे येऊ लागली आहे. सध्या तालुक्यातील जिरायती पट्ट्यात वीस टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आणखी तीन टँकरला नव्याने मंजुरी मिळाल्याची माहिती पंचायत समितीच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, काही भागात अवकाळी व वादळी पावसामुळे पिकांचे व घरांचे नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
तालुक्यातील जिरायती पट्ट्यात मागील तीन वर्षे पावसाने हुलकावणी दिली आहे. खरीप व रब्बीचे सलग दोन हंगाम वाया गेले आहेत. यावर्षी ज्वारीच्या पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी ज्वारीचे बाटूकही हाती लागले नाही. विशेषत: कऱ्हा नदीच्या उत्तरेकडील भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात टँकर सुरू ठेवावे लागले होते.
सध्या या पट्ट्यातील गोजुबावी ते कुतवळवाडी वढाणे यातील पारवडी व शिर्सुफळ वगळता सर्वच ठिकाणी टँकरने पाणी पुरविले जात आहे. त्यातही शिर्सुफळ गावातून नव्याने टँकरची मागणी होत आहे. याच भागातील सोनवडी सुपे, कारखेल देऊळगाव रसाळ, उंडवडी आदी भागातील वाड्या-वस्त्यांवरील पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. आणखी टँकरची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
> स्वतंत्र टँकरची मागणी
सध्या घरातील माणसांना पिण्याच्या पाण्याची तजवीज करताना धावपळ करावी लागत असताना, दारातील जनावरांना पाणी आाणायचे कोठून, असा सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे. तालुक्याच्या मोरगाव ते कऱ्हावागज या बावीस गावांपैकी मोरगाव-बारामती रस्त्यालगतच्या काही गावांत नाझरे जलाशयावरील पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळते. परंतु, अपुरा व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे याही भागातून स्वतंत्र टँकरची मागणी होत आहे. या भागातील भिलारेवाडी व सायंबाची वाडी या दोन गावांसाठी एक, तर तरडोली व मासाळवाडी यांसाठी एक, तर लोणीभापकर या गावासाठी एक अशा आणखी तीन टँकरना मंजुरी मिळाल्याची माहिती पंचायत समितीच्या सूत्रांनी दिली.