खडकवासला कालव्यावरील शेतीला ‘टेल टू हेड’पध्दतीने पाणी द्यावे : हर्षवर्धन पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 05:41 PM2020-05-20T17:41:07+5:302020-05-20T17:45:21+5:30
इंदापुर तालुक्यातील शेतीसिंचन व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
कळस: खडकवासला कालव्यावरील शेतीला सिंचनासाठी टेल टू हेड या प्रचलित धोरणाप्रमाणेच पाणी देण्यात यावे.प्रचलित धोरणाप्रमाणे पाणी मिळत नसल्याने कालव्याच्या टोकावरील इंदापुर तालुक्यातील शेतीसिंचन व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यात तात्काळ पाणी सोडावे,अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.
पाटील म्हणाले , तालुक्यातील शेटफळगढेपासुन बेडशिंगे पर्यंतच्या अनेक गावात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. येथील शेतकऱ्यांची कालव्याला पाणी सोडण्याची मागणी आहे. त्यामुळे याबाबत जलसंपदा विभागाचे सचिव प्रवीण परदेशी व जलसंपदा विभागाचे पुणे अधिक्षक संजीव चोपडे यांच्याकडे ही समस्या मांडुन पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दोन ते तीन दिवसात इंदापुर तालुक्यातील सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.
खडकवासला, वरसगाव, पानशेत व टेमघर या खडकवासला धरण साखळीतील कालव्यातुन नवीन मुठा कालव्यामार्फत हवेली, दौंड, इंदापूर व बारामती या चार तालुक्यात सिंचनासाठी पाणी देण्यात येते. मात्र पाणी देताना प्रचलित धोरणाप्रमाणे टेल टु हेड या पद्धतीने पाणी देण्यात नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे, मदनवाडी, पोंधवडी, निरगुडे, अकोले, वायसेवाडी, धायगुडेवाडी, कळस, पिलेवाडी,गोसाविवाडी, रुई, थोरातवाडी, मराडेवाडी, नाव्ही,डोंबाळवाडी, बोराटेवाडी, लोणीदेवकर, व्याहळी, कौठळी, बळपुडी,पोंदकुलवाडी, बिजवडी वडापुरी, बेडशिंगे या गावातील १५ हजार ९३८ हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसणार आहे. बारामती, दौंड, हवेली तालुक्याला पाणी मिळत असताना इंदापूर तालुक्यावर अन्याय होत आहे. धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये खडकवासला (३२ %), पानशेत (४१%),वरसगाव (२९.०%), टेमघर (२.१२%) या प्रमाणे आज पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे त्यामुळे टेल टु हेड या पद्धतीने तालुक्याला पाणी देण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
———————————