पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरात दर गुरुवारी पाणी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 09:47 AM2023-05-17T09:47:49+5:302023-05-17T09:49:53+5:30
शुक्रवारी आणि शनिवारी काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता...
पुणे : लांबणारा पावसाळा आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका या गुरुवार (दि. १८) पासून दर गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवणार आहे. त्यासाठी महापालिकेने २० ठिकाणी एअर वॉल बसविले असून, प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच शुक्रवारी आणि शनिवारी काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
एलनिनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यासोबतच आवश्यक तिथे पाणी कपात करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार पुणे महापालिका १८ मे पासून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवणार आहे. पुणे शहरात असे काही भाग आहेत ज्या ठिकाणी एका दिवशी पाणी बंद ठेवल्यानंतर पुढील तीन दिवस पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नागरिक त्रासून जातात. अशा भागात प्रशासन कशा पद्धतीने नियोजन करणार, हा कळीचा मुद्दा आहे.
शहरातील असे काही भाग आहेत ज्यांना टेल एन्ड म्हटले जाते. त्या ठिकाणी एक दिवस पाणी बंद ठेवले तर पुढील दोन दिवस पाणी कमी दाबाने येते. याबाबत तांत्रिक दुरुस्त्या केल्या आहेत. २० ठिकाणी एअर वॉल बसविले आहेत. ज्यामुळे हवेचा दाब कमी होईल आणि पाण्याचा दाब वाढणार आहे. वारजे, कर्वेनगर, येरवडा, खराडी, तळजाई पठार, रास्ता पेठ, नाना पेठ अशा ठिकाणी हे एअर वॉल बसविण्यात आले आहेत.