चक्क फिल्टर न करता पाणी पिऊ शकतो इतकी स्वच्छ मुठा; उगमाला छान, पुण्यात मात्र घाण...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 02:42 PM2022-12-18T14:42:38+5:302022-12-18T14:42:52+5:30

नैऋत्येकडील दाट झाडीतून नागिणीसारखी सळसळत मुठा नदी पुण्याकडे येते

Water so clean that you can drink it without filtering it Nice in Ugmal but dirty in Pune...! | चक्क फिल्टर न करता पाणी पिऊ शकतो इतकी स्वच्छ मुठा; उगमाला छान, पुण्यात मात्र घाण...!

चक्क फिल्टर न करता पाणी पिऊ शकतो इतकी स्वच्छ मुठा; उगमाला छान, पुण्यात मात्र घाण...!

Next

श्रीकिशन काळे

पुणे : नैऋत्येकडील दाट झाडीतून नागिणीसारखी सळसळत मुठा नदी पुण्याकडे येते. तशीच पश्चिमेकडून मुळा नदी येते आणि त्यांचा संगम पुण्यात होतो. उगमापाशी मुठा नदी अतिशय स्वच्छ आहे. तेथे तळ देखील दिसतो. चक्क फिल्टर न करता पाणी पिऊ शकतो. त्यामुळेच आम्ही उगमाजवळ गेल्यानंतर मुठेच्या प्रवाहातील स्वच्छ पाणी पिले आणि परिक्रमेला सुरुवात केली. उगमाला स्वच्छ व छान असणारी मुठा पुण्यात आल्यावर मात्र घाण दिसायला लागते. हेच वास्तव या परिक्रमेत स्पष्ट जाणवले.

‘लोकमत’च्या वतीने मुठा नदीची परिक्रमा करण्याचे ठरले. त्यानुसार नदीचे मूळ शोधून तिचे प्रदूषण नेमके कुठे आणि कसे होते, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मुळशी तालुक्यातील डोंगरात वसलेल्या वेगरे गावाच्या डोंगरात मुठेचा उगम आहे. वेगरे गावापर्यंत चारचाकीने पोहोचल्यावर तिथून पुढे चालतच उगमाकडे मार्गस्थ व्हावे लागले. कारण घनदाट जंगल आणि डोंगर परिसरातून एका डोंगरावर मुठेचा उगम पाहायला मिळाला.

मुठेच्या उगमावर गोमुख बसविले आहे. यासाठी ज्येष्ठ वनस्पती संशोधक डॉ. श्रीकांत इंगळहळीकर यांनी पुढाकार घेतला हाेता. नुकत्याच केलेल्या पाहणीत उगम मात्र कोरडा असल्याचे दिसले. कारण मुठा नदी ही पावसाळी असल्याने केवळ त्या काळातच ओसंडून वाहते. दिवाळीपर्यंत तिला पाणी असते. त्यानंतर उगमाला आटते आणि पुढील पात्रात जिवंत झरे, ओहोळ यांच्या माध्यमातून प्रवाही राहते.

पुण्यापासून सुमारे ६५ किलोमीटर अंतरावर मुठेचा उगम आहे. पुण्यातून भुकूम मार्गे उरावडे गावातून पुढे मुठा गावाकडे रस्ता जातो. पुढे आंदगाव-खारवडे-कोलवडेच्या पुढे लव्हार्डे गाव आहे. तिथे मुठेचा प्रवाह खळाळता पाहायला मिळाला. तेथील पाणीही फिल्टर न करता पिण्यायोग्य आहे. लव्हार्डेच्या पुढे टेमघर धरण लागते. तिथून पुढे कच्चा रस्ता आहे. डोंगरातून वळणावळणाचा कच्चा रस्ता थेट वेगरे गावाकडे जातो. त्यानंतर वेगरे गावात गाडी लावून तिथून पायीच मुठेच्या उगमाकडे चालत जावे लागते. हे अंतर साधारण तीन किलोमीटर आहे.

मुठेच्या उगमाकडे जाताना मध्ये टेमघरचे बॅकवॉटरचे दृश्य मनमोहक वाटते. ते मुठेचे मोठे पात्र पाहून हीच शहरातील गटारगंगा आहे का? असं वाटते. बॅकवॉटर संपल्यानंतर खरीखुरी मुठा छोट्याशा प्रवाहाने खळाळत वाहताना दिसून आली. या नदीकाठची जैवविविधताही विपुल प्रमाणात पाहायला मिळाली. त्यामुळे अतिशय सुंदर, संपन्न अशा मुठेचे दर्शन या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर डोंगरावर गेल्यानंतर उगम आहे. त्या ठिकाणी मुठा कोरडी आहे. कारण पावसाळ्यातच मुठा उगमाला ओसंडून वाहते. दिवाळीपर्यंत ती तशीच राहते. दिवाळीनंतर मात्र उगमाला कोरड पडते. त्यानंतर पुढील नदी पात्र हे तेथील डोंगराखालील जिवंत झऱ्यांमुळे प्रवाही असल्याचे दिसून आले. त्यामुळे नदीकाठचे झरे, ओहळ हेच जिवंत नदीचे लक्षण आहे. म्हणून झऱ्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे.

या परिक्रमेसाठी जीवितनदीच्या शैलजा देशपांडे, मोनाली शहा, उमा कळसकर, अश्विनी भिलारे, ज्येष्ठ वनस्पती अभ्यासक उष:प्रभा पागे, जलबिरादरीचे गिरीश पाटील आदी सहभागी झाले होते.

मुठेच्या उगमाकडे दुर्लक्ष

शहरात मुठा आणि मुळा या दोन्ही नद्यांमधून सांडपाणीच वाहते. त्यामुळे पुणे महापालिकेला शहरातील नदी सुधारसाठी कोट्यवधींचा खर्च करावा लागत आहे; पण मुठेच्या उगमाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वेगरे गावातील लोकांनी केला. त्या ठिकाणी देखील काही निधी खर्च करावा, अशी इच्छा मुठा नदीकाठी असलेल्या वेगरे ग्रामस्थांची आहे.

मुळा-मुठा म्हणजे शापित रंभा-मेनकाच!

- प्रख्यात प्राच्यविद्या संशोधक रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांना १८८४ मध्ये एक जुनं हस्तलिखित गवसलं. अतिशय जीर्णावस्थेतील त्या हस्तलिखितात तब्बल ४२ अध्याय आहेत. पण त्याचा रचनाकारण कोण ते शोध लागला नाही. या हस्तलिखितात जरी प्रामुख्याने भीमा-माहात्म्य दिलेलं असलं, तरी भीमेच्या उपनद्यांबद्दलही मनोरंजक गोष्टी दिलेल्या आहेत. या हस्तलिखिताचं मराठी भाषांतर दत्त किंकर नावाच्या कवीने केलं आहे. ४२ अध्यायांत २४४९ ओव्या आहेत. यात सव्विसाव्या अध्यायात मुठा नदीचे वर्णन आहे.

- भीमाशंकर पर्वतावर गजानक राजाने कठोर शिवभक्ती सुरू केली. या तपश्चर्यामुळे भगवान शिवशंभू गजानकाला प्रसन्न होतील आणि आपलं इंद्रपद जाईल, अशी भीती देवराज इंद्रला वाटू लागली. म्हणून त्याने आपल्या दरबारातील दोन अप्सरांना गजानकाच्या तपश्चर्येचा भंग करण्यासाठी पाठविले. इंद्राचा हा कावा गजानकाच्या ध्यानी आला. म्हणून त्याने स्खलनशील अप्सरांना तुम्ही नद्या व्हाल, असा शाप दिला. त्या अप्सरांनी गयावया केल्यानंतर तुमचा भीमा नदीशी संगम झाल्यावर तुम्हाला मुक्ती मिळेल, असा उ:शापही दिला.

शापापेक्षाही प्रदूषणाचे दु:ख अधिक 

इंद्राच्या दरबारात रंभा-मेनकेप्रमाणे मूळच्या अप्सरा असणाऱ्या या शापित अप्सरा मुळा-मुठा नद्यांच्या रूपाने वाहू लागल्या. एकेकाळच्या या अप्सरारूपी नद्यांमध्ये सांडपाणी आणि औद्योगिक प्रदूषित पाणी मिसळून ती गटारगंगा बनल्या आहेत. शापापेक्षाही त्यांना प्रदूषणाचे दु:ख अधिक बोचत असेल, असा दाखला वनस्पतीतज्ज्ञ, गडकिल्ले अभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर यांनी त्यांच्या ‘मुठेच्या काठी’ या पुस्तकात दिला आहे.

Web Title: Water so clean that you can drink it without filtering it Nice in Ugmal but dirty in Pune...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.