एका दिवसात महिनाभराचा पाणीसाठा जमा : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 01:28 PM2019-07-08T13:28:41+5:302019-07-08T14:20:27+5:30
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणीलोट क्षेत्रातदमदार पाऊस होत आहे.
पुणे: पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणीलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे गेल्या २४ तासात शहराला एक महिना पुरेल ऐवढा म्हणजे सुमारे १.५० टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. दुष्काळ परिस्थितीमुळे पुणेकरांवर गेल्या सहा-सात महिन्यांपासून पाणी कपातीची टांगती तलवार अखेर दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गतवर्षी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला होता. यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकलपातील सर्व चारही धरणे शंभर टक्के भरली होती. परंतु त्यानंतर झालेली कालवा फुटी प्रकरण, जिल्ह्यात पडलेला प्रचंड दुष्काळ व पाटबंधारे विभागाचा नियोजन शुन्य कारभार यामुळे ऑक्टोबर-नोंव्हेंबर पासूनच पुणेकरांवर पाणी कपात लादण्यात आली. नोव्हेबर महिन्यांपासून पुणेकरांना एकवेळच पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यातही धरणांचा पाणी साठा झपाट्याने कमी होत असून, पुणेकरांना दिवसाआड पाणी पुरवठा सुरु करा, असा तगादा पाटबंधारे विभागाने लावला होता. परंतु तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाणी कपात न करण्याची ठोस भूमिका घेतली. यामुळे पुणेकरांवरील पाणी पात टळली होती. परंतु संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने पाणी पुरवठ्यासाठी चिंत्तेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र २८ जून पासून पुणे शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात झाली.
खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला प्रकल्पात २८ जून रोजी केवळ २.२० टीएमसी म्हणजे ७.५२ टक्केच पाणी साठा शिल्लक होता. त्यानंतर गेल्या दहा दिवसांत या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्या झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे दहा दिवसांत पाणीसाठा २.२० टीएमसीवरून थेट ६.२५ टीएमसी झाला आहे. यामुळे पाणी टंचाईचे संकट निर्माण झालेल्या पुणेकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. आज अखेर खडकवासला प्रकल्पात एकूण ६.२५ टीएमसी म्हणजे २१.४१ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. पुणे शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी महिन्याला सरासरी सव्वा टीएमसी पाणी साठा लागतो. यामुळे सध्या पुढील चार-पाच महिन्यांच्या किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर झाला आहे.
-----------------------
एक दिवसांत दीड टीएमसी पाणी जमा
शनिवार (दि.६) पासूनच खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरु आहे. यामध्ये टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वांधिक म्हणजे ६४ मि.मी, वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २१ मि.मी तर पानशेत धरणामध्ये सुमारे ३० मि.मी पावसाची नोंद झाली. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ९ मि.मी नोंद झाली. या पावसामुळे धरणांमधील पाण्याच्या येवा झपाट्याने वाढत आहे. शनिवारी सकाळी चारही धरणांमध्ये एकूण ४.७५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. एका दिवसात यामध्ये १.५० टीएमसीने वाढ होऊन रविवारी सायंकाळ पर्यंत हा पाणी साठा ६.२५ पर्यंत गेल्याची अधिकृत माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
-----------------------
खडकवासला प्रकल्पातील धरणांतील पाणी साठ्याची माहिती (टीएमसीमध्ये)
प्रकल्प प्रकल्पीय साठा सद्यस्थिती टक्केवारी पाऊस
खडकवासला १.९७ ०.८८ ४४.५५ ९ मिमी
पानशेत १०.६५ ३.०४ २८.५१ ३० मिमी
वरसगाव १२.८२ २.१५ १६.७७ २१ मिमी
टेमघर ३.७१ ०.१८ ४.९८ ६४ मिमी
एकूण २९.१५ ६.२५ २१.४७