बारामतीत १६ टँकरद्वारे १२ गावांना पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 11:40 PM2019-01-06T23:40:23+5:302019-01-06T23:41:03+5:30
पाणीटंचाईची समस्या गंभीर : महिला ग्रामस्थांचे हाल
बारामती : तालुक्याच्या जिरायती भागातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सध्या जिरायती भागातील १२ गावांना व १४० वाड्या-वस्त्यांना १६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरच्या मागणीचे प्रस्तावदेखील पंचायत समितीकडे दाखल होत आहेत. त्यामुळे टँकरची संख्या वाढत जाणार आहे.
बारामती तालुक्यातील जिरायती पट्ट्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील तरडोली, देऊळगाव रसाळ, मोराळवाडी, मुर्टी, सोनवडी सुपे, कुतवळवाडी, बोरकरवाडी, काºहाटी, पानसरेवाडी आदी गावांना शासकीय टँकरने, तर काळखैरवाडी, कारखेल, भिलारवाडी, जळगाव सुपे, बाबुर्डी, गाडीखेल, वढाणे, मुर्टी, मोढवे, उंडवडी, कडेपठार, खराडेवाडी, आंबी खुर्द आदी गावांना खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकूण १२ गावे व १४० वाड्या-वस्त्यांवरील ३१ हजार ७१७ लोकसंख्येला ६० पैकी ४९ खेपांद्वारे पाणी पुरवण्यात येत आहे. पुढील महिन्यापासून उन्हाचा चटका वाढणार आहे. परिणामी पाणीटंचाईची समस्या गंभीर स्वरूप धारण करेल. टँकरच्या मागणीतदेखील वाढ होणार आहे. पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता उन्हाळ्यात टँकरची संख्या ५० चा आकडा ओलांडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दुष्काळाच्या झळांमध्ये वाढ...
काºहाटी : बारामतीच्या जिरायती भागात दुष्काळाची भीषणता इतकी वाढली आहे, की झाडांना पाने राहिली नाहीत. पाण्याअभावी परिसरातील वटवृक्षांची पालवी संपूर्णपणे गळून गेली आहे.
एरवी जानेवारी महिन्यामध्ये हिरवेगार असणारी झाडे डिसेंबरमध्येच पानगळती होऊन बसले आहेत. चार-पाच वर्षांच्या दुष्काळाचा परिणाम झाडाझुडपांवर मोठ्या प्रमाणात झाला असून, कित्येक झाडे-झुडपे या दुष्काळातून नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नदीच्या काठावर असणाऱ्या गावांना या दुष्काळात सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. सलग पाच वर्षांच्या दुष्काळाने कºहा नदीचे पात्र खळखळलेच नाही. दुष्काळामुळे जनावरांबरोबर पिण्याच्या पाण्याचा, तसेच चाºयाचा मोठा प्रश्न पुढील काही महिन्यांमध्ये अधिकच तीव्र होणार आहे.