पुण्यातील चारही धरणातील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा २ टीएमसीने वाढ; आत्तापर्यंत २७.४७ टक्के पाणी जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 01:34 PM2021-06-23T13:34:40+5:302021-06-23T13:36:05+5:30
खडकवासला प्रकल्पातील चारही धरणात मिळून आज सकाळपर्यंत ८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला असल्याची पाटबंधारे विभागाची माहिती
पुणे: यंदाचा अवकाळी पाऊस आणि मान्सूनच्या जोरदार आगमनाने पुण्यातील खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव या धरणाच्यापाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २ टीएमसीने वाढ झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणात मिळून आज सकाळपर्यंत ८ टीएमसी म्हणजे २७.४७ टक्के पाणीसाठा जमा झाला असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली आहे.
यंदा एप्रिल महिन्यापासून पुण्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर मान्सूनचे आगमन होईपर्यंत अवकाळी पाऊस पडत होता. अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा धरणे भरण्यास लवकर सुरुवात झाली. गतवर्षी मात्र यादिवशी चारही धरणात मिळून ५.८१ टीएमसी पाणी उपलब्ध होते. आता २ टीएमसीने वाढ झाली असून ८.०१ पाणीसाठा जमा झाला आहे. तर टक्केवारी १९.९३ वरून २७.४७ वर आली आहे.
आजपर्यंत खडकवासला ५९.६० टक्के, पानशेत ३५.५४ टक्के, वरसगाव १९.८५ टक्के, टेमघर १३.५३ टक्के पाणी जमा झाले आहे. चारही धरणात ८.०१ टीएमसी म्हणजे १.३९० टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. पानशेत वरसगावमध्ये अनुक्रमे ३९ व ५१ क्यूसेकने पाणी जमा होत आहे.
मागील २४ तासात खडकवासला धरण येथे पाऊसच झालेला नाही. पानशेत येथे आठ, वरसगाव येथे सात तर टेमघर येथे १५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजता खडकवासला येथे ०, पानशेत १, वरसगाव २ व टेमघर २० मिलिमीटर पाऊस झाला होता. शनिवारपासून खडकवासला साखळीतील पावसाचा जोर फार कमी होत गेला आहे. परिणामी धरणाच्या पाणी साठ्यात हळूहळू वाढ होत आहे.