निवडणुकीत मेहरबान झालेल्या महापालिकेकडून पुन्हा पाणी कपात सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 06:00 AM2019-04-30T06:00:00+5:302019-04-30T06:00:08+5:30
निवडणूक संपताच ऐन उन्हाच्या तडाख्यामध्ये महापालिकेकडून अघोषित पाणी कपात सुरु केली आहे.
पुणे: लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दीड-दोन महिने दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवणा-या महापालिकेकडून निवडणुका जाहीर होताच दर गुरुवारी होणारी पाणी कपात रद्द केली. परंतु निवडणूक संपताच ऐन उन्हाच्या तडाख्यामध्ये महापालिकेकडून अघोषित पाणी कपात सुरु केली आहे. यामुळे येत्या गुरुवार (दि.२) रोजी देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणार खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा शिल्लक असला तरी राज्य आणि जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने जानेवारी महिन्यांपासूनच जलकेंद्र, पंपीग स्टेशन आणि पाईप लाईनच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेऊन अघोषित पाणी कपात सुरु केली होती. यामुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे प्रमाण पंधरा दिवसांवरुन दर आठवड्याला पाणी पुरवठा बंद करण्यात येत होता. परंतु निवडणुक जाहिर झाल्यानंतर ११ मार्च नंतर दर गुरुवारी करण्यात येणारी पाणी कपात रद्द करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा निवडणुकांचे मतदान पूर्ण होतातच महापालिकेकडून पुन्हा पाणी कपात सुरु करण्यात आली आहे.
------------------
या भागात गुरवारी पाणी पुरवठा बंद राहणार
शहराला पाणी पुरवठा करणा-या पर्वती जलकेंद्र पंपींग, रॉ वॉटर पंपींग, वडगाव जलकेंद्र, एसएनडीटी-वारजे जलकेंद्र आणि होळकर पंपिंग स्टेशन येथील विद्युत व पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जाणार आहेत. यामुळे येत्या गुरुवार (दि.०२) रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी देखील संपूर्ण शहरात उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
.......................
गुरुवारी या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद - पर्वती जलशुद्धीकरण केंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, पर्वती गाव, मुकुंदनगर, सहकारनगर, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे क्र ४२, ४६ कोंढवा खुर्द, पर्वती आणि पद्मावती टँकर भरणा केंद्र. वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक. चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, बावधन, बाणेर, चांदणी चौक, महात्मा सोसायटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, गुरुगणेशनगर. लष्कर जलकेंद्र : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, येरवडा परिसर, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, मुंढवा, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, गोंधळेनगर, सातववाडी. नवीन होळकर पंपिंग : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड परिसर.
--------------------------
पालकमंत्र्याच्या नियोजन शुन्य कारभाराचा फटका
शहराचे पालकमंत्री व सत्ताधारी भाजपचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या नियोजन शुन्य कारभाराच फटका पुणेकरांना बसत आहे. खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा शिल्लक असताना देखील केवळ योग्य नियोजन न केल्याने पुणेकरांना नोव्हेंबर-डिसेंबर पासूनच पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. पालकमंत्री आपल्या सोयीनुसार कारभार करतात यामुळे निवडणुकीमध्ये एक महिना दर गुरुवारी होणार पाणी कपात त्यांनी बंद ठेवली.
- दिलीप बराटे, विरोधीपक्ष नेते महापालिका
-------------------------
भाजपच्या खोट्या बोलण्याच्या संस्कृतीमुळे पुणेकरांवर संकट
देशात, राज्यात आणि महापालिकेमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपची संस्कृतीच खोटी बोलण्याची आहे. यामुळे खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये किती पाणी शिल्लक आहे, पाण्याचे वाटप कसे केला जाणार याबाबत पालकमंत्र्यांनी पुणेकरांना आधारामध्ये ठेवले. निवडणुका जाहिर होण्यापूर्वी दोन-तीन महिने दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत होता. परंतु मतदार आपल्या विरोधामध्ये जातील या धास्तीने पाण्याची गंभीर परिस्थिती असताना देखील पाणी पुरवठ्याचे कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. यामुळे आता पुढील दीड-दोन महिने पुणेकरावर पाणी कपातीचे गंभीर संकट ओढावले आहे.
-अरविंद शिंदे, काँगे्रस गटनेते, महापालिका