Pimpri Chinchwad: जलवाहिनी फुटल्याने चिंचवड, सांगवीमधील पाणीपुरवठा विस्कळीत
By विश्वास मोरे | Published: January 27, 2024 11:41 AM2024-01-27T11:41:26+5:302024-01-27T11:41:58+5:30
पिंपरी: चिंचवड वाल्हेकरवाडी रस्त्यावरील जलवाहिनी फुटल्याने शनिवारी सायंकाळी होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही. पिंपरी चिंचवड ...
पिंपरी: चिंचवड वाल्हेकरवाडी रस्त्यावरील जलवाहिनी फुटल्याने शनिवारी सायंकाळी होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही. पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्रातून ग्रॅव्हिटी लाईनने विविध भागात पाणीपुरवठा केला जातो.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सायंकाळी वाल्हेकरवाडी येथे थेरगाव ग्रॅव्हीटी लाईन अचानक फुटली. लाखो लिटर पाणी वाया गेले. सुट्टी असल्याने पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी उशिराने पोहोचले. त्यानंतर सेक्टर २३ येथून केला जाणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले होते.
टाक्या न भरल्याने पाणी येणार नाही!
सेक्टर २३ मधील शुद्धीकरण केंद्रातून ग्रॅव्हिटी लाईनने विविध भागांमध्ये असलेल्या टाक्यांमध्ये पाणी सोडले जाते. व या टाक्या भरल्यानंतर जलवाहिनीद्वारे विविध भागात पाणीपुरवठा केला जातो. जलवाहिनी फुटल्याने
वाकड , थेरगाव, काळेवाडी, रहाटणी,पिंपळे निलख, पिंपळे सौदागर , सांगवी परिसरातील टाक्या भरलेल्या नाहीत. त्यामुळे आज सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. पाणी पुरवठा विभागामार्फत काम तातडीने करण्यात येत आहे. सायंकाळी ही पाणीपुरवठा कमी दाबाने किंवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पिण्याचे पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
सुटीच्या दिवशी पाणी नसल्याने नागरिकांनी व्यक्त केली नाराजी!
सुट्टीच्या दिवशी अचानकपणे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. शुक्रवारी सायंकाळी व शनिवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.