Alandi: आळंदी शहरातील पाणीपुरवठा दोन दिवसांपासून विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 12:21 PM2023-06-17T12:21:44+5:302023-06-17T12:23:22+5:30
इतर दिवशीही तांत्रिक बिघाड, गळती आदी कारणांमुळे पाणीपुरवठा बंद राहत असल्याने शहरातील पाण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे...
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी शहरातील पाणीपुरवठा मागील तीन दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. त्यामुळे विकत पाणी घेण्याची वेळ आळंदीकरांवर आली आहे. भामा आसखेड धरणातील कमी झालेला पाणीपुरवठा लक्षात घेता पुण्याप्रमाणे आळंदी शहरातही दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद असतो. १८ मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र इतर दिवशीही तांत्रिक बिघाड, गळती आदी कारणांमुळे पाणीपुरवठा बंद राहत असल्याने शहरातील पाण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे.
आळंदी शहरास पुणे महानगरपालिकेच्या पाइप लाइनवरून पाणीपुरवठा होतो. पुणे महानगरपालिकेची सतराशे मिलिमीटर पाइपलाइनला गळती झाली आहे. तसेच, पुणे शहरात पाणी कपात धोरणामुळे पाणी बंद असल्याने सदर पाइपलाइन गळती काढण्याचे काम सुरू केले आहे. मात्र हे मोठ्या स्वरूपातील काम असल्यामुळे कामास विलंब लागत आहे. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर कुरळी येथील जॅकवेल केंद्रावर पाणी पोहोचण्यास सुमारे चार तासांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर आळंदीला पाणी पोहोचण्यास सुमारे अर्धा - एक तास कालावधी लागणार आहे. त्यामुळे आळंदी शहरात भामा आसखेडवरून पाणी येण्यास विलंब होणार आहे. पाणी आल्यानंतर जलकुंभ भरून शहरात उशिराने पाणीपुरवठा विभागवार सुरू करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान आळंदी शहरात पाण्याची टंचाई नित्याची झाली आहे. ऐनवेळी पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने आळंदीकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार कधी? असा सवाल स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
भामा आसखेड वरून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे लिकेज काढण्याचे काम सकाळी ६.३० वाजता पूर्ण झाले असून कुरुळी येथील केंद्रावर पंपिंगचे काम सुरू आहे. सदर पाईपलाईन १६ किमी असून दोन दिवसापासून कोरडी असल्याने लाईन वाश आउट करण्यासाठी चार तास कालावधी लागणार आहे. त्यामुळे कुरुळी येथील केंद्रावर सकाळी १०.३० पर्यंत पाणी येण्याची शक्यता असून तेथून आळंदी शहरास सकाळी ११.०० पर्यंत पाणी पोहोचणार आहे. त्यानंतर टाक्या भरून सुमारे बाराच्या सुमारास शहरातील गावठाण परिसरातील टप्प्यास पाणी सोडले जाईल.
- शीतल जाधव, पाणीपुरवठा विभाग प्रमुख आळंदी नगरपरिषद.