जलसंपदा मांडणार पाणीवाटपाचे गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 01:18 AM2018-12-06T01:18:55+5:302018-12-06T01:19:01+5:30
शहराची नेमकी लोकसंख्या, तरती लोकसंख्या, शहरालगतच्या गावांना करण्यात येणारा पाणीपुरवठा, त्यानुसार वाढीव पाण्यासाठी महानगरपालिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे (एमडब्ल्यूआरआरए) बाजू मांडण्याच्या तयारीत आहे.
पुणे : शहराची नेमकी लोकसंख्या, तरती लोकसंख्या, शहरालगतच्या गावांना करण्यात येणारा पाणीपुरवठा, त्यानुसार वाढीव पाण्यासाठी महानगरपालिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे (एमडब्ल्यूआरआरए) बाजू मांडण्याच्या तयारीत आहे. जलसंपदा विभाग महापालिकेने शपथपत्रात दिलेल्या लोकसंख्येनुसार पाणीवाटप करण्यावर ठाम असून, महापालिकेचा दावा खोडण्यासाठी विभागाकडून पाणीवाटपाचे गणित सुनावणीत मांडण्यात येणार आहे.
येत्या गुरुवारी (दि. १३) प्राधिकरणासमोर पाणीवाटपाबाबत सुनावणी होत आहे. त्यात पुणे महापालिका शहराची लोकसंख्या नक्की किती आहे, याबाबतही माहिती देणार आहे. तसेच शहराला सध्या मिळणाऱ्या पाण्यापेक्षा अधिकचे पाणी मिळावे, याकरिता प्रयत्न करणार आहे. राज्य सरकारने लोकसंख्येवर आधारित पाण्याचा मापदंड ठरवण्याबाबत शासननिर्णय काढला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास शहराला मिळणाºया पाण्यात कपात होणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेला शहराची लोकसंख्या नक्की किती आहे, त्याची माहिती जलसंपत्ती प्राधिकरणाला सुनावणीदरम्यान द्यावी लागणार आहे. त्यानंतरच पुण्याला अधिकचे पाणी द्यावे की नाही, याबाबत निर्णय होईल.
महापालिकेला शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आणि मापदंडानुसार पाणी द्यावे, असा प्रस्ताव जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता यांच्याकडे देण्यात आला होता. पुणे महापालिकेने लोकसंख्येनुसार ११.५० अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याऐवजी ८.१९ टीएमसी पाणीवापर करावा आणि प्राधिकरणाच्या धोरणांची अंमलबजावणी करावी, अशी भूमिका जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी घेतली. त्यावर महापालिकेने प्राधिकरणाकडे दाद मागितली आहे. त्याची सुनावणी १३ डिसेंबरला होत असून, त्यामध्ये महापालिकेला लोकसंख्येची सुधारित माहितीही सादर करावी लागेल.
शहराची लोकसंख्या ३९.१८ लाख, कॅन्टोन्मेंट बोर्ड व शेजारील गावे मिळून १.५८ लाख अशी एकूण ४०.७६ लाख लोकसंख्या असल्याचे शपथपत्र महापालिकेने यापूर्वी दिले आहे. प्राधिकरणाच्या मापदंडानुसार प्रतिमहिना १३५ लिटर आणि १५ टक्के गळती मिळून दरमहा दरडोई १५५ लिटर पाणी देता येणार आहे. त्यामुळे पुण्याला ८.१६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देणे योग्य ठरेल.
महापालिकेचा २०१७-१८ मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक १८.७१ टीएमसी पाणीवापर झाला आहे. नोव्हेंबर-डिसेंबर २०१७, जानेवारी-मार्च २०१८ या पाच महिन्यांत सरासरी प्रतिदिन १६०० दशलक्ष लिटर पाणीवापर आहे.
याच कालावधीमध्ये काही वेळा महत्तम पाणीवापर प्रतिदिन १७५० दशलक्ष लिटरपर्यंत झाला आहे. असे विविध मुद्दे जलसंपदा विभागाकडून मांडले जाणार आहेत.