एमआयडीसीचा पाणीपुरवठा सातव्या दिवशी सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2016 02:43 AM2016-04-25T02:43:18+5:302016-04-25T02:43:18+5:30
एमआयडीसीचा पाणीपुरवठा सातव्या दिवशी सुरू करण्यात अखेर एमआयडीसी प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान निवासी झोनमधील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे
बारामती : एमआयडीसीचा पाणीपुरवठा सातव्या दिवशी सुरू करण्यात अखेर एमआयडीसी प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान निवासी झोनमधील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे. मात्र, एमआयडीसीची यंत्रणा तोकडी पडल्यामुळे बारामती नगरपालिकेने पुढाकार घेऊन येथील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष योगेश जगताप, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी दिली.
बारामती एमआयडीसीचा पाणीपुरवठा अखेर सातव्या दिवशी सुरू करण्यात एमआयडीसी प्रशासनाला यश आले आहे. रविवारी (दि. २४) पहाटे ५ वाजता एमआयडीसीला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. गेल्या ६ दिवसांपासून हा पाणीपुरवठा ठप्प होता. उद्योगांसह येथील रहिवाशांना यामुळे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
दरम्यान, एमआयडीसीचा भाग नगरपालिकेच्या हद्दीत येत नाही. परंतु, बारामतीकर नागरिक म्हणून तेथील रहिवाशी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला. हद्दवाढीतील रुई भागाला देखील टँकरने पाणीपुरवठा करीत असताना एमआयडीसीच्या नागरिकांना देखील माणुसकीच्या भावनेतून पाणीपुरवठा केला, असे नगराध्यक्ष जगताप यांनी सांगितले.
उजनी जलाशयाची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली. परिणामी एमआयडीसीचा पाणीपुरवठादेखील बंद झाला. मंगळवारी (दि. १९) हा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. उद्योगांवर टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली. तर येथील परिसरात होणाऱ्या नागरिकांनी जारमधील पाणी विकत आणले. अनेकांवर वापराचे पाणी आणण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. पाणी आणण्याचा एमआयडीसी प्रशासनाचा प्रयत्न सुरू असताना जीर्ण जलवाहिनीतून एमआयडीसीला पाणी आणताना होणारी चोरी थांबविण्यासाठी उद्योजकांनी आक्रमक भूमिका घेतली. पोलिसांकडे एमआयडीसीच्या अभियंत्यांनी पाणी वापरणाऱ्या संबंधितांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी त्यांना कडक शब्दांत समज दिली. त्यामुळे एमआयडीसीतून होणारी गळती थांबविण्यात पोलिसांना यश आले. तसेच, एमआयडीसीला पाणीपुरवठा सुरळीत करणे शक्य झाले.
बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत थेट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला. बारामती नगरपालिका प्रशासनाने पाणीटंचाईच्या काळात टँकरची सोय केल्याने एमआयडीसीतील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला.
कार्यकारी अभियंता अे. के. आगवणे यांनी सांगितले की, रविवारी पहाटे ५ वाजल्यापासून एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तसेच, रेसिडेन्शीयल झोनमध्ये पुरेशा दाबाने ३ तास पाणीपुरवठा होईल, यासाठी दोन विद्युतपंप सुरू करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)