पवना धरणातील जलविद्युत निर्मिती केंद्रात बिघाड झाल्याने पिंपरी चिंचवडमधील पाणीपुरवठा विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 10:52 AM2021-04-07T10:52:21+5:302021-04-07T10:59:14+5:30
बुधवार आणि गुरुवार सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत
पिंपरी: पवना धरण येथील जलविद्युत निर्मिती केंद्रात बिघाड झाल्यामुळे नदीमध्ये कमी प्रमाणात पाणी सोडले आहे. त्यामुळे रावेत बंधाऱ्याची पातळी कमी झाली आहे. परिणामी, जलउपसा कमी झाल्याने संपूर्ण शहरातील आज आणि उद्या सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.
मावळातील पवना धरणातूनपिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर २३ निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. परंतु पवना धरण येथील जलविद्युत निर्मिती केंद्रात बिघाड झाल्याने नदीमध्ये कमी प्रमाणात पाणी सोडले आहे. रावेत बंधाऱ्याची पातळी कमी झाली आहे.
याबाबत, जल संपदा विभागाशी समन्वय साधण्यात आला असून पाणी पुरवठा लवकरात लवकर पुर्ववत करण्याचा विभागाचा प्रयत्न राहील. तरी, नागरिकांनी याची नोंद घेऊन उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण लडकत यांनी केले आहे.