पाणीपुरवठ्याच्या प्रयोगाने पळाले तोंडचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 03:10 AM2018-10-28T03:10:19+5:302018-10-28T03:10:46+5:30

नियोजन नसल्याने नागरिकांना मनस्ताप; कोथरूडला सकाळी, तर शिवाजीनगरला सायंकाळी पाणी

Water supply run by water supply | पाणीपुरवठ्याच्या प्रयोगाने पळाले तोंडचे पाणी

पाणीपुरवठ्याच्या प्रयोगाने पळाले तोंडचे पाणी

Next

पुणे : एसएनडीटी पाण्याच्या टाकीतून कोथरूड आणि शिवाजीनगरच्या काही भागाला सकाळी आणि उरलेल्या भागाला सायंकाळी पाणीपुरवठा होत होता; पण काही दिवसांपासून त्यात बदल करून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कोथरूडला सकाळी तर शिवाजीनगरला सायंकाळी पाणीपुरवठा करण्याचा प्रयोग सुरू केला़ प्रायोगिक तत्त्वावर हे सुरू केले तरी महापालिकेचा प्रयोग झाला; पण लोकांच्या तोंडचे पाणी पळाले, अशी स्थिती शिवाजीनगर भागात गेल्या काही दिवसांत दिसून येत आहे़ शुक्रवारी तर त्यात वैदूवाडी परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवरील व्हॉल्व्ह फुटल्याने त्या भागाला पाणीच मिळाले नाही.

एसएनडीटी टाकीतून कोथरूड, कर्वेनगर आणि शिवाजीनगरच्या जंगली महाराज रोडपर्यंतच्या भागाला पाणीपुरवठा होतो़ दोन्ही ठिकाणच्या भागाला सकाळी व सायंकाळी एक वेळ पाणीपुरवठा होत असल्याने सर्वांना पाणी मिळत होते़ त्यात एसएनडीटी टाकीत आवश्यक पाण्याची पातळी राखण्यासाठी खूप धावपळ होत असे़ अचानक थोडा जरी व्यत्यय आला तरी सर्व पाणीपुरवठा विस्कळीत होत होता़ त्यासाठी काही दिवसापूर्वी सकाळी कोथरूड व कर्वेनगरला आणि सायंकाळी गोखलेनगर, जनवाडीपासून जंगली महाराज रोडपर्यंतच्या भागाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले.

सेनापती बापट रोडवरून जाणाºया मोठ्या पाईपलाईनमधून शिवाजीनगरला पाणीपुरवठा होतो़ या सर्व भागाला एकच वेळी पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केल्याने सेनापती बापट रोडपासून उताराकडे सर्व पाणी धावू लागले़ त्यामुळे गोखलेनगर, जनवाडीसारख्या उंचावर असलेल्या भागाला अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ लागला़ सोसायट्यांच्या टाक्याही भरणे अशक्य झाले़ त्यात शुक्रवारी सायंकाळी वैदूवाडी, आशानगर, शिवाजी हौसिंग सोसायटी भागाला पाणीपुरवठा करणाºया मुख्य लाईनवरील वेताळबाबा चौकातील व्हॉल्व्ह रात्री फुटला़ त्यामुळे वेताळबाबा चौकात सर्वत्र पाणीच पाणी झाले़ हे पाणी सकाळपर्यंत वाहत होते.

पाणी येत नसल्याने सर्वच भागातील पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याने लोकांच्या तक्रारी वाढू लागल्याचे पहाताच गोखलेनगर, दीप बंगला परिसरातील सर्वच पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले़ त्यात नीलेश निकम, उदय महाले, बाळासाहेब बोडके व इतर कार्यकर्ते उपस्थित होते़ त्यांनी एसएनडीटी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी राजेंद्र जाधव यांच्याकडे तक्रारी केल्या.

एकाच वेळी इतक्या तक्रारी आल्याने जाधव स्वत: सेनापती बापट रोडवरील शेती महामंडळ येथे जेथून व्हॉल्व्ह सोडला जातो, तेथे आले; पण त्यांना व त्यांच्या कर्मचाºयांनाही गोखलेनगर, जनवाडी तसेच दीप बंगला या उताराच्या भागालाही कमी दाबाने का पाणीपुरवठा होतो, हे समजू शकले नाही़ तोपर्यंत रात्री नऊ वाजता या भागातील पाणी गेले़ अनेक सोसायट्यांच्या टाक्या अर्धवट भरल्या़ लोकांचा हा
उद्रेक लक्षात घेऊन शनिवारी पहाटे पुन्हा या भागाला पाणी सोडण्यात आले होते. वेताळबाबा चौकात फुटलेला व्हॉल्व्ह दुरुस्त करण्याचा काम दुपारी एक वाजेपर्यंतही पूर्ण झाले नव्हते़ दुपारी ३ च्या सुमारास ते पूर्ण झाले.

स्वच्छतागृह बंद ठेवण्याची वेळ
शिवाजीनगर भागात शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला़ काही ठिकाणी अतिशय कमी वेळ पाणीपुरवठा झाला़ ज्ञानेश्वर पादुका चौकातील पेट्रोल पंपावर त्यामुळे शनिवारी पाणीच उपलब्ध नसल्याने त्यांना नाइलाजाने तेथील स्वच्छतागृह बंद ठेवण्याची वेळ आली होती़

उद्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयावर मोर्चा
शिवाजीनगर भागाला होत असलेल्या कमी पाणीपुरवठाविरोधात गोखलेनगर, जनवाडी, दीप बंगला चौक, शिवाजीनगर भागातील शिवसेनेच्या वतीने सोमवारी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयावर मोर्चा काढणार येणार असल्याची माहिती उमेश वाघ यांनी दिली़

Web Title: Water supply run by water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.