शिरूरला चार टँकरने पाणीपुरवठा
By admin | Published: April 16, 2016 03:49 AM2016-04-16T03:49:59+5:302016-04-16T03:49:59+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोडनदीवरील बंधाऱ्यात पाण्याचा विसर्ग येण्यास दोन दिवस लागणार असून, नागरिकांच्या सोयीसाठी नगर परिषदेने चार पाण्याचे टँकर सुरू केल्याची
शिरूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोडनदीवरील बंधाऱ्यात पाण्याचा विसर्ग येण्यास दोन दिवस लागणार असून, नागरिकांच्या सोयीसाठी नगर परिषदेने चार पाण्याचे टँकर सुरू केल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी दिली. शहरातील २८ बोअरवेल्सही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरूरच्या पुढे आंबेगाव हद्दीपर्यंत असणाऱ्या बंधाऱ्याचे ढापे काढून पाण्याचा विसर्ग शिरूरच्या बंधाऱ्यात आणण्यासाठी नगर परिषदेचे गेल्या तीन ते चार दिवसांपासून प्रयत्न सुरू असून, शेतकऱ्यांनी काढलेले ढापे पुन्हा काढू नये म्हणून नगर परिषदेचे कर्मचारी २४ तास वरील बंधाऱ्यांच्या ठिकाणी गस्त घालत आहेत. आमदाबादपर्यंत पाणी आले असून, शिरूरच्या बंधाऱ्यात परवा पहाटेपर्यंत पाणी विसर्ग येण्याची शक्यता असल्याचे थोरात यांनी सांगितले. गेल्या सहा दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प आहे. अशात नागरिकांच्या सोयीसाठी नगर परिषदेने चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. तहसीलदारांना विनंती केल्याने उद्या आणखी तीन टँकर सुरू होतील, असे थोरात यांनी सांगितले. २८ बोअरवेल्स सुरू असून, तेथेही नागरिकांची पाण्याची सोय करण्यात आली आहे. ज्यांना शक्य आहे, अशा नागरिकांनी पाण्याच्या टँकर (खासगी) मागणीवर भर दिला असून, मागणी वाढल्याने टँकरचीही कमतरता भासू लागली आहे. डिंभेतून मागवलेले आवर्तन कॅनॉलद्वारे सोडण्यात येणार असून, हे आवर्तन ‘टेल टू हेड’ असल्याने हे आवर्तन शहराला मिळण्यासाठी मे उजाडणार आहे. या आवर्तनाने बंधारा भरण्याची शक्यता आहे.
पाण्याच्या टँकरचे दरही यामुळे ७०० रुपयांहून १००० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. नगर परिषदेने टँकर सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळेल
बंधाऱ्यात पाणी आल्यावर शहराला पुन्हा पाणीपुरवठा केला जाणार आहे. पंधरा दिवस पुरेल एवढाच हा साठा असेल.