शिवणे-उत्तमनगरमधील नागरिकांची पाणीपट्टी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:11 AM2021-06-09T04:11:52+5:302021-06-09T04:11:52+5:30
पुणे : महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या ११ गावांपैकी शिवणे-उत्तमनगर परिसरातील नागरिकांची पाणीपट्टी महापालिकेने रद्द केली आहे. या भागाला महाराष्ट्र ...
पुणे : महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या ११ गावांपैकी शिवणे-उत्तमनगर परिसरातील नागरिकांची पाणीपट्टी महापालिकेने रद्द केली आहे. या भागाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे पाणीपुरवठा केला जात नसतानाही पालिकेकडून पाण्यावर कर आकारला जात होता. त्यामुळे मिळकत करामधील पाणीपट्टी रद्द करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये मंजुरी दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
शिवणे आणि उत्तमनगरचा समावेश अडीच वर्षांपूर्वी पालिकेच्या हद्दीत झाला. समाविष्ट ११ गावांपैकी ९ गावांमध्ये पालिकेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या दोन गावात केला जात नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मिटरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने बिल प्राधिकरणाला भरले जाते. मात्र, पालिकेकडून मिळकतकरात पाणीपट्टीचे बिल आकारले जात असल्याने नागरिकांना दुहेरी भुर्दंड बसत होता. त्यामुळे नगरसेवक आणि नागरिकांकडून दोन्ही पैकी एक बिल रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अभिप्राय मागवण्यात आल्यानंतर मिळकत करातून पाणीपट्टीचे बिल रद्द करण्याचे नमूद करण्यात आले. पालिकेकडून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरच पाणीपट्टी आकारण्यात यावी, असे अभिप्रायात नमूद करण्यात आले होते.
-----
ज्या मिळकतधारकांनी सन २०२१-२२ चा मिळकतकर पाणीपट्टीसह भरलेला आहे त्यांची पाणीपट्टीची रक्कम २०२२-२३ च्या मिळकतकराच्या बिलातून वजा करावी, असेही अभिप्रायामध्ये नमूद करण्यात आले आहे.
---