पुरंदरच्या दक्षिण भागात टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 01:38 AM2018-11-03T01:38:15+5:302018-11-03T01:38:30+5:30
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा पुढाकार
नीरा : पुरंदरचा दक्षिण-पूर्व पट्टा कायम टंचाईग्रस्त म्हणून घोषित असतो. या वर्षी मात्र ऐन उन्हाळ्यात एकाही वस्तीवर टँकरची गरज भासली नव्हती. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विहिरींची पाणीपातळी खालावली. त्यामुळे शासनदरबारी हेलपाटे मारण्यापेक्षा येथील लोकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडे तातडीने पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी केली होती. मे महिन्यापासून आजपर्यंत सलग २ टँकरने तीन गावांतील सात वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे.
ग्रामपंचायतीच्या फक्त एका मागणीपत्रावर ट्रस्टने तातडीने वाड्या-वस्त्यांवर मागेल त्याला पाणीपुरवठा सुरू केला आहे. पुरंदर तालुक्याच्य दक्षिण-पूर्व पट्ट्यात मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यावर्षी पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण जाणवली नाही. मात्र उन्हाळ्यात ढगाळ वातावरणामुळे विहिरींची पाणीपातळी कमालीची खालावली. मे महिन्यात उन्हाळी वळवाचा एखाददुसरा पाऊस झाला असता तर पुढील काळात पिण्याचे पाणी पुरले असते. उन्हाळ्यात वळवाचा एकही पाऊस न झाल्याने पाण्याची भटकंती करावी लागली. उन्हाळ्यापासून राख गावठाण, महादेववस्ती, चव्हाणवस्ती, रणवरेवाडी, वाल्हे गावच्या पूर्वेकडील अंबाजीचीवाडी, मुकादमवाडी, गायकवाडवाडीसह वाड्या-वस्त्यांवरील, तसेच कर्नलवाडी येथील झिरपवस्ती येथे टंचाई निर्माण झाल्याने ग्रामपंचायतींनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडे टँकरची मागणी करताच एका दिवसात टँकर सुरू झाल्याने गावकऱ्यांच्या डोक्यावर हंडा घेण्याची वेळ आली नाही.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जय गणेश आपत्ती निवारण अभियान गणेश अमृतजल पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टंचाईग्रस्त गावांसाठी तत्कालीन पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे तोपर्यंत टँकरने मोफत पाणीपुरवठा केला जाईल.
- महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट