रेल्वेला नळचोरांचा झटका; नळ बसविण्याचा खर्च सुमारे ५ लाख रुपयांपर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 11:14 AM2019-10-07T11:14:28+5:302019-10-07T11:18:52+5:30
रेल्वेने चांगल्या सुविधा देऊनही काही प्रवाशांकडूनच त्याला ठेंगा दाखविला जात असल्याचे समोर आले आहे..
पुणे : रेल्वेमध्ये चांगल्या सुविधा सुविधा मिळत नसल्याची ओरड अनेक प्रवासी करतात. बंद पंखे, एसी, दिवे यांसह खराब आसने, ब्लँकेट, अस्वच्छता अशा विविध कारणांसाठी रेल्वेच्या कामकाजावर बोट ठेवले जाते. पण रेल्वेने चांगल्या सुविधा देऊनही काही प्रवाशांकडूनच त्याला ठेंगा दाखविला जात असल्याचे समोर आले आहे. पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस व मुंबई-गडग एक्सप्रेस या दोन गाड्यांमधील तब्बल ३ लाख रुपये किंमतीचे ब्रँडेड नळ व इतर साहित्य चोरीला गेले आहे. हे नळ बसविण्याची मजुरी व इतर खर्च धरल्यास हा आकडा सुमारे ५ लाख रुपयांपर्यंत जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. या नळचोर प्रवाशांमुळे रेल्वे प्रशासनही गोंधळून गेले आहे.
प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. डब्ब्यांमधील स्वच्छतेसह दिवे, पंखे, एसी, स्वच्छतागृहातील देखभाल याकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी तत्परतेने अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच अनेक गाड्यांचे रुपडेही पालटले जात आहे. मध्य रेल्वेकडून काही महिन्यांपूर्वीच डेक्कन एक्सप्रेसला नवी झळाळी दिली. गाडीमध्ये उच्च दर्जाच्या सुविधा दिल्या आहेत. त्यामध्ये स्वच्छतागृहात ब्रँडेड कंपन्यांचे नळ व इतर साहित्य बसविण्यात आले आहे. मात्र मार्च महिन्यापासून आतापर्यंत जवळपास १०० हून अधिक नळ व इतर साहित्य प्रवाशांनी चोरले आहे. असाच प्रकार मुंबई-गडग (कर्नाटक) एक्सप्रेसमध्येही घडला आहे. या गाडीला ७० वस्तु चोरीला गेल्या आहेत.
रेल्वेच्या उत्कृष्ट प्रकल्पाअंतर्गत मेल व एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांना आधुनिक सुविधा दिल्या जात आहेत. डब्यांमधील सुविधा अद्ययावत करण्यात येत आहेत. त्यानुसार मुंबई विभागाकडून गडग व डेक्कन एक्सप्रेसचा चेहरा मोहरा बदलला आहे. प्रत्येक डब्यासाठी सुमारे ६० लाखांचा खर्च केला आहे. प्रवाशांना गरजा ओळखून हे बदल केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळत आहेत. पण काही प्रवाशांकडून नळासह विविध साहित्याची चोरी होत असल्याने रेल्वे प्रशासनाला चांगलाच झटका बसत आहे. शेवटच्या थांब्यावर गाडी रिकामी झाल्यानंतर चोरीचे प्रकार घडत असावेत, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
................
डेक्कन एक्सप्रेसमधील डब्ब्यांच्या स्वच्छतागृहात प्रसिध्द ब्रॅण्डचे २४० नळ व इतर साहित्य बसविले होते. त्यापैकी ९९ नळ व इतर साहित्य चोरीला गेले आहे. तर गडग एक्सप्रेस १६० पैकी ७० नळ व इतर साहित्य चोरीला गेले आहे. यामधील एक नळ व इतर साहित्याची किंमत प्रत्येकी १४०० ते २८०० एवढी आहे. त्यामुळे चोरीमुळे तब्बल ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.