Pune: वडगावशेरी, लोहगावचा पाणी पुरवठा गुरुवारी राहणार सुरू
By राजू हिंगे | Published: June 21, 2023 03:22 PM2023-06-21T15:22:46+5:302023-06-21T15:27:29+5:30
वडगावशेरी मतदार संघातील भामा आसखेडच्या माध्यमातून जो पाणी पुरवठा होत आहे त्यामध्ये गेल्या वर्षभरात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत...
पुणे : भामा आसखेड प्रकल्पाच्या जलवाहिनीवर सातत्याने गळती होत आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी वेळ जात आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी दुपारपर्यंत पाण्याच्या लाईनच्या गळतीमुळे नागरिकांचे पाण्याविना अतोनात हाल झाले आहेत. त्यामुळे भामाआसखेड प्रकल्पातून पाणी पुरवठा होणाऱ्या वडगावशेरी, लोहगाव, विमाननगर भागाचा पाणीपुरवठा येत्या गुरूवारी (दि. 22) सुरू राहणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
वडगावशेरी मतदार संघातील भामा आसखेडच्या माध्यमातून जो पाणी पुरवठा होत आहे त्यामध्ये गेल्या वर्षभरात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. परिसरातील नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे अपुरा पाणी पुरवठा होत आहे. चाकरमान्यांची, गृहिनींची गैरसोय होत आहे. भामा आसखेडच्या परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत आहे. परिणामी पाणीपुरवठा होत नाही. भामा आसखेडच्या लाईनवर सातत्याने गळती होत आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी वेळ जात आहे. तोपर्यंत नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
गेल्या आठवडयात गुरुवारी पाणी पुरवठा बंद होता. शुक्रवारी पूर्ण दिवसभर कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. शनिवारी दुपारपर्यंत पाण्याच्या लाईनच्या गळतीमुळे नागरीकांचे पाण्याविना अतोनात हाल झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या गुरुवारी (दि. 22) पुणे शहरात होणारा पाणी कपातीचा निर्णय भामा आसखेड परिसरात लागू नये, अशी मागणी पालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह अनेक नागरिकांनी केली होती. नागरिकांची पाण्याची गैरसोय होउ नये यासाठी गुरूवारी वडगावशेरी, लोहगाव, विमाननगर भागाचा पाणीपुरवठा येत्या गुरूवारी सुरू राहणार आहे असे पुणे महापालिकेेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.