सोसायट्यांमध्ये होणार पाणीतंटे; मीटर मुख्य वाहिनीला असल्याने वापरावरून होणार झगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 03:52 AM2018-02-17T03:52:58+5:302018-02-17T04:00:47+5:30
पाणी देण्याची आपली जबाबदारी सोसायटीच्या कुंपणापर्यंत, त्यापुढची जबाबदारी सोसायटीची असे महापालिका समजत असल्यामुळे समान पाणी योजनेचे बिल यायला लागल्यानंतर सोसायट्यांमध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यातून स्वतंत्र नळजोड तर होतीलच; शिवाय पाणी साठवणूक टाक्यांची संख्याही सोसायटीत वाढतील, असे दिसते आहे.
- राजू इनामदार
पुणे : पाणी देण्याची आपली जबाबदारी सोसायटीच्या कुंपणापर्यंत, त्यापुढची जबाबदारी सोसायटीची असे महापालिका समजत असल्यामुळे समान पाणी योजनेचे बिल यायला लागल्यानंतर सोसायट्यांमध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यातून स्वतंत्र नळजोड तर होतीलच; शिवाय पाणी साठवणूक टाक्यांची संख्याही सोसायटीत वाढतील, असे दिसते आहे.
गेल्या काही वर्षांत पुणे शहरात सोसायट्यांच्या संख्येत फार मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. किमान ७ हजार तरी सोसायट्या असतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. सोसायटी कायद्यानुसार नोंदणी न झालेल्या सोसायट्यांची संख्या यापेक्षाही जास्त असणार आहे. एका सोसायटीत किमान १५ सदनिकाधारक तरी असतातच. त्याशिवाय २०० पेक्षा जास्त सदनिका असलेल्या मोठ्या सोसायट्यांची संख्याही बरीच आहे.
या सोसायट्यांनी त्यांच्या सदस्यसंख्येला पुरेसे असतील इतके नळजोड महापालिकेकडून घेतले आहे. सध्या त्यांना मीटरप्रमाणे नाही तर वार्षिक पाणीपट्टी आकारली जाते. समान पाणी योजनेत आता त्यांच्या नळजोडावर मीटर बसवले जाईल. तीन नळजोड असतील तर तिन्हींवर व त्यापेक्षा जास्त असले तरी सर्वच नळजोडांवर मीटर बसवण्यात येणार आहे. त्यातून किती दिले गेले, त्यावर महापालिका त्यांना दरमहा बिल आकारणी करेल. ते पैसे सोसायटीने महापालिकेकडे जमा करायचे आहेत. कारण ग्राहक म्हणून सोसायटीचीच नोंद महापालिका दप्तरात असणार आहे.
सोसायटीने हे बिल आपल्या सदस्यांमध्ये विभागून त्याप्रमाणे पैसे जमा करायचे व ते महापालिकेत भरायचे, असे यात अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ते शक्य होणार नाही अशी चिन्हे आहेत. कारण प्रत्येक घरातील सदस्यसंख्येत फरक असतोच. काही घरांमध्ये फक्त दोनच व्यक्ती, तर काही घरांमध्ये एकत्र कुटुंब असेल तर १० पेक्षा जास्त व्यक्ती असतात. सोसायटीने आपल्या सदस्यांना समान बिल आकारणी केली तर त्यांच्याकडून याला विरोध होण्याची शक्यता आहे. दोनच सदस्य असलेले कुटुंब १० सदस्यांच्या कुटुंबाइतके बिल द्यायला तयार होणार नाही. त्यातून वाद निर्माण होतील, असे दिसते आहे.
महापालिकेने याचा विचारच केलेला दिसत नाही. आयुक्त कुणाल कुमार यांना याबाबत विचारले असता त्यांनी महापालिकेची जबाबदारी सोसायटीपर्यंत पाणी आणून देण्याची आहे. त्यापुढची जबाबदारी सोसायटीची असेल, असे स्पष्ट केले. त्यामुळे सदस्यसंख्येनिहाय बिल आकारणी करण्याचे नवे काम सोसायटीच्या पदाधिकाºयांना करावे लागणार आहे. त्यावरूनही आम्ही इतके पाणी वापरलेच नाही, असा युक्तिवाद होण्याचे नाकारता येत नाही. सोसायटीच्या दरमहाचा देखभाल दुरुस्तीचा खर्च देण्यास काकू करणारे काही सदस्य असतात. ते पाण्यासाठी दरमहा असा खर्च देतील का, याविषयी महापालिकेच्याच पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांना शंका आहेत.
टाक्यांचा प्रश्न होणार गंभीर
१प्रत्येक सदस्याने स्वतंत्र नळजोड घ्यायचा हा यावरचा उपाय आहे, मात्र त्यामुळे सोसायटीच्या आवारात पाणी साठवणूक टाक्यांची संख्या वाढतील. कारण महापालिकेचे पाणी दुसºया मजल्यापेक्षा जास्त वर चढत नाही.
२सध्या सोसायटीची एकच पाणी साठवण टाकी असते व तिला पंप लावून ते पाणी प्रत्येक घरात पोहोचवण्याची व्यवस्था केलेली असते. स्वतंत्र नळजोड घेतला गेल्यास संबंधित कुटुंब त्याची स्वतंत्र टाकी सोसायटीच्या आवारात करेल. त्यासाठी त्याला जागा लागेल. ती कशी द्यायची व किती टाक्या करून द्यायच्या हा एक वेगळाच प्रश्न सोसायटीसमोर निर्माण होणार आहे.
३सध्या चारचाकी वाहन लावण्यासाठी सोसायटी त्या जागेच्या सदनिकाधारकाला पैसे आकारत असते. टाकीसाठी तसा निर्णय घेतला गेला तर सोसायटीची बरीच रिकामी जागा लागेल व सोसायटीत जागाही शिल्लक राहणार नाही. तसेच त्यातून इमारतीच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित होणार आहे.
यावर सोसायटीतच निर्णय होणे अपेक्षित आहे. सदस्यसंख्येनुसार त्यांना बिल आकारणी करणे अपेक्षित आहे किंवा सोसायटीनेच प्रत्येक सदस्याला त्याच्या नळजोडावर मीटर बसवून दिले तरी हा प्रश्न सुटणारा आहे.
- कुणाल कुमार, आयुक्त, महापालिका
महापालिकेची जबाबदारी सोसायटीच्या कुंपणापर्यंत पाणी पोहोचवण्याचीच आहे. त्यापुढची व्यवस्था सोसायटीनेच पाहायची असते. त्यामुळे आमचे मीटर सोसायटीपर्यंत जे नळजोड गेले आहेत, त्यावरच असेल व त्याप्रमाणेच बिल आकारणी होईल.
- व्ही. जी. कुलकर्णी,
अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा