Pune | पुण्यात रमजान महिन्याच्या सुरुवातीलाच पाणी पुरवठा होणार खंडित
By निलेश राऊत | Published: March 21, 2023 03:04 PM2023-03-21T15:04:53+5:302023-03-21T15:05:13+5:30
गुरुवारी शहराच्या पूर्व व पश्चिम भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवला...
पुणे : रमजान महिन्यात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज खंडीत होऊ नये म्हणून महापालिकेने महावितरणला पत्र दिले खरे. पण स्वत:च रमजान महिन्याच्या सुरुवातीलाच जलशुध्दीकरण केंद्राचे काम काढून, गुरुवारी ( दि.२३ ) शहराच्या पूर्व व पश्चिम भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवला आहे.
रमजानचा पवित्र महिना येत्या २४ मार्चपासून सुरू हाेत आहे. या काळात, म्हणजे २२ मार्चपासून संपूर्ण महिना पाणीपुरवठा सुरळीत राखण्यासाठी पाणीपुरवठा केंद्रांचा विद्युत प्रवाह खंडित करू नये, असे पत्र काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला दिले होते. पण नेहमीप्रमाणे गुरूवारचा मुहूर्त काढून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने चिखली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये फ्लो मीटर बसविण्याच्या कामाबरोबरच, पर्वती ते एस.एन.डी.टी. दरम्यान अस्तित्वात असलेल्या १२०० मि.मी. व्यासाचे पाण्याच्या लाईन मधील गळती बंदचे काम करण्यात येणार आहे. तसेच चतुश्रुंगी येथील आशा नगर भागातील पाण्याच्या टाकीला पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या लाईनचे मुख्य जलवाहिनीला जोडणेचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या सर्व भागातील पाणीपुरवठा येत्या गुरूवारी बंद राहणार आहे व दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि. २४ मार्च रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
चतुश्रुंगी टाकीवरून पाणीपुरवठा बंद होणारा भाग : चतुश्रुंगी टाकी परिसर, औंध, बोपोडी, औंध रोड, खडकीचा काही भाग (पुणे मुंबई महामार्ग), अभिमानश्री सोसायटी, विधाते वस्ती, आय.टी.आय. रोड, पंचवटी, कस्तुरबा वसाहत, सिध्दार्थ नगर, औंध गाव, पुणे विद्यापीठ परिसर, भाऊ पाटील रोड, बाणेर रोड परिसर, भोईटे वस्ती, सिंध सोसायटी, सानेवाडी, आनंद पार्क, नागरस रोड, आय.सी.एस. कॉलनी भोसले नगर, इंदिरा वसाहत, सकाळ नगर, अनगळ पार्क, राजभवन.
चिखली जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा बंद होणारा भाग :- चिखली जलशुद्धीकरण केंद्र, गणेश नगर बोपखेल, म्हस्के वस्ती आळंदी रोड, टिंगरेनगर, आदर्श कॉलनी, बमशिल झोपडपट्टी, पुणे एअर पोर्ट लोहगाव, राजीव गांधी नगर (नॉर्थ आणि साऊथ), विमाननगर, यमुनानगर, श्रीपार्क सोसायटी, पाराशर सोसायटी, दिनकर पठारे वस्ती, ठुबे पठारे नगर, खराडी बायपास रोड