ठेकेदारांच्या अडवणुकीमुळे पाणी पाणी रे
By admin | Published: December 25, 2015 01:55 AM2015-12-25T01:55:02+5:302015-12-25T01:55:02+5:30
शहरातील अनेक आळ्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने २ कोटी ८५ लाख ५६ हजारांच्या कामांना नगरपालिकेने मंजुरी दिली आहे.
भोर : शहरातील अनेक आळ्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने २ कोटी ८५ लाख ५६ हजारांच्या कामांना नगरपालिकेने मंजुरी दिली आहे. मात्र, सहा महिने झाले ठेकेदार काम करीत नाही. त्यामुळे कमी दाबाच्या पाण्यापासून नागरिकांची सुटका झालीच नाही.
वेळेत कामे सुरू झाली नाही तर पुन्हा मुदतवाढ मागवी लागू शकते. त्यामुळे यावर्षी पाणीपुरवठा सुरळीत होणे अशक्य वाटत आहे.
अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत होते. त्यामुळे नगरसेवकांनी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आमदार संग्राम थोपटे यांनी शहरातील सुभाष चौक ते बौद्धवस्ती (२,८४,१,७६० रु.), पोलीस स्टेशन ते नगरपलिका (५,६३,४,२२० रु.), नगरपलिका ते सुभाष चौक (६,१४,५,४८० रु.), धुमाळनगर (२,८३,४,३९० रु.), वेताळपेठ (५,५६,७,७४० रु.), फिल्टर दुरुस्ती (५,४३,२,७०० रु.) अशी एकूण २ कोटी ८५ लाख ५६ हजार २९० रुपयांची कामे मंजूर करून आणली.
यात सुमारे तीन ते साडेतीन किलोमीटरची ६ इंची, ८ इंची व १२ इंची पाईपलाईन कामांचे टेंडर १२ व १३ जुलै रोजी विविध ठेकेदारांनी भरले. त्यापैकी नळ पाणीपुरवठा पाईपलाईनची पाचही कामे बी. जी. नलावडे यांना तर फिल्टर दुरुस्तीचे काम एस. के. एन्टरप्रायजेस यांना मिळाले.
सदरची कामे मंजूर होऊन सहा महिने झाले आहेत. तर नगरपलिकेने २२ सप्टेंबरलाच कामाची वर्कआॅडर दिली आहे, म्हणजे त्यालाही तीन महिने उलटले; मात्र अद्याप कामे सुरू झालेली नाहीत.
याबाबत भोर नगरपलिकेने संबंधीत ठेकेदाराला एक नोटीस दिली आहे. मात्र अद्याप काम सुरू झाले नाही. त्यामुळे शहरातील विविध आळ्यांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नगरपलिकेचा एकच फिल्टर सुरू असल्याने विनाफिल्टरचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. मात्र याकडे नगरपलिका प्रशासन व ठेकेदारांचे दुर्लक्ष होत आहे.
याबाबत ठेकेदार नलावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. नगरसेवकही वारंवार फोन करतात. मात्र त्यांचाही कधीच फोन लागत नसल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)