निमगावात पाण्याचे टँकर बंद
By admin | Published: April 19, 2016 01:04 AM2016-04-19T01:04:41+5:302016-04-19T01:04:41+5:30
निमगाव केतकी व वाड्यावस्त्यांवर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू असलेले पाण्याचे टँकर अचानक बंद करण्यात आल्याने पाण्याची टंचाई पुन्हा निर्माण झाली आहे.
निमगाव केतकी : निमगाव केतकी व वाड्यावस्त्यांवर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू असलेले पाण्याचे टँकर अचानक बंद करण्यात आल्याने पाण्याची टंचाई पुन्हा निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईची झळ केतकेश्वर महाराज यात्रेच्या निमीत्ताने येणाऱ्या भाविकांना बसणार असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, बंद करण्यात आलेले पाण्याचे टँकर तातडीने पुन्हा सुरू करण्यात यावेत, याकरिता जिल्हा परिषेद सदस्य देवराज जाधव पाठपुरावा करीत आहेत. मात्र, तलाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडून टँकर सुरू करण्यासाठीची कोणतीही कार्यवाही अद्याप केली जात नसल्याचे जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील ग्रामदैवत श्री केतकेश्वरमहाराज यांची यात्रा तीन दिवस भरवली जाते. या यात्रेच्या निमित्ताने नोकरी-व्यवसायासाठी बाहेर असलेले नागरिक गावी येतात. याबरोबरच, यात्रेमध्ये व्यवसाय करण्यासाठी पाळणेवाले, खेळणीविक्रेते, फळविक्रेते, खाद्य पदार्थविक्रेते, आइस्क्रीमविक्रेते आदी येतात. त्यांना पाण्याची आवश्यकता असते; परंतु पाणीटंचाई असल्याने या व्यवसायिकांना पाणी कसे पुरवायचे, याचे आव्हान ग्रामपंचायतीसमोर निर्माण झाले आहे. यात्रेच्या कालावधीमध्ये पहिल्या दिवशी रथाची मिरवणूक काढली जाते. या वेळी निमगाव केतकीसह परिसरातील अनेक गावांतील भाविक श्रद्धेने दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. काही भाविक नवस फेडण्यासाठी येतात. या मिरवणुकीच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे अवश्यक असते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी श्रीकेतकेश्वर महाराजांच्या पालकीची मिरवणूक काढण्यात येते.या वेळी हे कार्यक्रम पाहण्यासाठी महिला व पुरुष मोठया संख्येने परिसरातून येतात. या वेळी आलेल्या यात्रेकरूंची पिण्याच्या पाण्याची सोय करणे गरजेचे असते.