पुणे - नाशिक महामार्गावर पाण्याचे तळे; महामार्गावर वाहनांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 08:42 PM2022-07-21T20:42:11+5:302022-07-21T20:45:01+5:30
दुपदरी रस्ता असल्याने महामार्गावर अनेकवेळा वाहतूक कोंडी...
मंचर :पुणे - नाशिक महामार्गावर मंचर शहरात गुजराथी हॉस्पिटलसमोर पाण्याचे तळे साचले असून, त्यामुळे वारंवार वाहतुकीला अडथळा होतो. पुणे - नाशिक महामार्ग मंचर शहरातून डॉ. साळी हॉस्पिटल ते महात्मा गांधी विद्यालय असा गेला आहे. बायपास रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने सध्या सर्व वाहतूक मंचर शहरातून सुरू असते. दुपदरी रस्ता असल्याने महामार्गावर अनेकवेळा वाहतूक कोंडी झालेली दिसते.
मागील पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला पाण्याची तळी साचतात. पुणे - नाशिक महामार्गावर साइडपट्ट्या भरलेल्या नाहीत. गटारांची कामे झालेली नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोलगट भाग झाला आहे व त्यामध्ये पावसाचे पाणी साचून राहते.
डॉ. गुजराथी हॉस्पिटलसमोर खोल जागा असल्याने येथे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. हे पाणी रस्त्याच्या एका लेनपर्यंत येऊन वाहतुकीला अडथळा होतो. अनेकवेळा रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पाण्यामुळे रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत. साळी हॉस्पिटल ते गुजराथी हॉस्पिटल यादरम्यान रस्त्याच्या या बाजूला दलदल होते.
थोड्याशा पावसाने चिखल होऊन नागरिकांना ये-जा करता येत नाही. शिवाय पुणे बाजूकडे जाणारी वाहने साचलेल्या पाण्यामुळे लेन बदलून विरुद्ध बाजूला जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी भराव टाकण्याची मागणी होत आहे. साइडपट्ट्या भरण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.