भोर शहरात खुलेआम मोटर टाकून विहिरीतून पाणीचोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:09 AM2021-03-18T04:09:46+5:302021-03-18T04:09:46+5:30
आमराई आळीमधील संस्थांकालीन विहिरीतून नगरपालिका पाणीपुरवठा केला जातो, त्यात नगरपालिकेने १० एच.पी.च्या मोटरने ३० घरांसह अग्निशमन दलासाठी आणि भाजी ...
आमराई आळीमधील संस्थांकालीन विहिरीतून नगरपालिका पाणीपुरवठा केला जातो, त्यात नगरपालिकेने १० एच.पी.च्या मोटरने ३० घरांसह अग्निशमन दलासाठी आणि भाजी मंडई यांना अधिकृतपणे कर घेऊन पाणीपुरवठा केला जातो. मात्र, त्याच विहिरीत ७.५ एच.पी.ची बेकायदेशीर मोटर टाकून शहरातील बांधकाम व्यावसायिक असलेल्या इमारतीसाठी पाणीपुरवठा केला जात होता. विशेष म्हणजे, बेकायदेशीरपणे पाणी उपसा करणाऱ्या मोटरचे लाइट बिल हे नगरपालिकाच भरत आहे. म्हणजे पाणी कोण वापरते आणि बिल सर्वसामान्य लोकांच्या करातून का भरले जात होते, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
शिवसेना शहर प्रमुख नितीन सोनावले व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुहित जाधव यांनी माहिती अधिकारात मिळलेल्या माहितीनुसार, भोर नगरपालिका वर्षाला सदर विहिरीवर सरासरी ४ लाख रुपये खर्च करत आहे. त्यात लाइट बिल २ लाख ९२ हजार ११० रुपये, तर विहीर देखभाल व इतर खर्च ४२ हजार इतका करण्यात येत आहे. या शिवाय एक कामगार पाणी सोडायला असतो. त्यावर नगरपालिकेला कर हा फक्त ३६ हजार १७५ रुपये इतका मिळतो. एकूणच काय, तर एखाद्या नेत्यांचा मनमानी कारभारामुळे लाखो रुपयांचा तोटा बसूनही नगरपालिका मूग गिळून गप्प बसली आहे. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यावर नगरपलिकेने मोटर जप्त करण्याची कारवाई केली आहे. जप्त केलेल्या मोटरचा पंचनामा करून बेकायदेशीरपणे पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास, न्यायालयात दावा दाखल करून उपोषणाचा इशारा माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे व भोर शहर शिवसेनाप्रमुख नितीन सोनावले यांनी दिला आहे.
दरम्यान, पाणीचोरीबाबत शिवसेना आणी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माहितीच्या अधिकारात मागणी करून माहिती मिळाल्यानंतर, नगरपलिका प्रशासन खडबडून जागे होऊन विहिरीत टाकलेली बेकायदेशीर मोटर जप्त करून आज दुपारी काढून नेली आहे.
आमराई आळी येथील संस्थानकालीन असलेली आणि भोर नगरपलिकेकडील विहिरीत टाकलेली ७.५ एच.पी.ची मोटर बेकायदेशीर आहे. त्यामुळे सदरची मोटर जप्त करण्याची कारवाई भोर नगरपालिकेने काल दुपारी करून, या मोटरवरील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
डॉ.विजयकुमार थोरात मुख्यधिकारी भोर न.पा.