जवळार्जुनला पुरंदर उपसा योजनेतून जलवाहिनीद्वारे पाणी
By admin | Published: May 6, 2017 01:57 AM2017-05-06T01:57:02+5:302017-05-06T01:57:02+5:30
सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत नियोजित कामासाठी जवळार्जुन ग्रामपंचायतीत पदाधिकारी, ग्रामस्थ व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत
लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी : सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत नियोजित कामासाठी जवळार्जुन ग्रामपंचायतीत पदाधिकारी, ग्रामस्थ व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. पुरंदर उपसा योजनेची जलवाहिनी जवळार्जुन गावापर्यंत टाकण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून अंदाजपत्रक तयार करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
सांसद आदर्श ग्राम योजनेमध्ये जवळार्जुन हे गाव माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दत्तक घेतले आहे. दीड-दोन वर्षांपासून येथे विविध कामे करण्यात आली आहेत. मागील महिन्यात २१ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत कामांचा आढावा घेण्यात आला, त्या वेळी ग्रामस्थांचा सहभाग नसल्याबद्दल त्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली. तसेच, उर्वरित कामे वेगाने करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना पवार यांनी केली होती.
दरम्यान, संबंधित कामाचा आढाव्यासाठी जवळार्जुन ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. बैठकीला जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुगार्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुधाकर टेकवडे, सरपंच सोनाली टेकवडे, उपसरपंच शिवाजी राणे, ग्रामसेवक एस. बी. लोणकर, रामभाऊ राणे, सचिन टेकवडे, जनार्दन टेकवडे, श्रीकांत राणे, सतीश साळुंखे, नवनाथ राणे, अंकुश टेकवडे आदी उपस्थित होते.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा उघडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. शाखाही लवकरच सुरू होईल, असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.
नाझरे धरणावरील पाण्याचा फिल्टर दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविला आहे. सोलर पवनचक्की बसविण्याबाबत प्रवीण शिंदे व सुदाम इंगळे यांनी माहिती दिली.
पुरंदर उपसा योजनेचे पाणी ग्रामस्थ विकत घेतात; मात्र ७ ते ८ किलोमीटर अंतरावरून पाणी कालव्यातून येत असल्याने ते वाया जाते. याबाबत कोळविहिरे हद्दीमधून गेलेल्या पुरंदर उपसाच्या जलवाहिनीतून जवळार्जुन गावाच्या हद्दीपर्यंत जलवाहिनी टाकावी, अशी मागणी त्या वेळी ग्रामस्थांनी केली होती.
पुरंदर उपसा योजनेचे अधिकाऱ्यांकडून अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, लवकरच जवळार्जुनला थेट जलवाहिनीद्वारे पाणी मिळणार आहे. ओढा खोलीकरण, बंधारे बांधणे यासाठीचे अंदाजपत्रक तयार करून पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे. कृषी विभागाच्या पाणलोट विकास योजना, जलयुक्त शिवार अंतर्गत कंपार्टमेंट बल्डिंग याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली.