पाण्यावरून खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2016 04:30 AM2016-04-24T04:30:43+5:302016-04-24T04:30:43+5:30
जिल्ह्यातील पाणीटंचाई बाबत पुणे स्टेशन येथील विधानभवन येथे आयोजित केलेल्या कालवा समिती बैठकीत पुण्याच्या पाण्यावरून पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर प्रशांत जगताप
पुणे : जिल्ह्यातील पाणीटंचाई बाबत पुणे स्टेशन येथील विधानभवन येथे आयोजित केलेल्या कालवा समिती बैठकीत पुण्याच्या पाण्यावरून पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर प्रशांत जगताप यांच्यामध्ये खडाजंगी झाली.
पुण्याला ज्या कालव्यातून पाणी येते, त्यातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असल्याने ती रोखण्यासाठी उपाय योजना करण्याच्या सूचना देऊनही पालिका त्याबाबत काहीच करीत नसल्याने आणि नळबंद योजना सुरू करीत नसल्याने पालकमंत्र्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. कालवा दुरुस्त करण्यासाठी पुण्याला पुरविण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला. पुण्याच्या पाण्यात कपात करणार नाही, अशी भूमिका महापौरांनी घेतली. त्यामुळे पालकमंत्री आणि महापौरांमध्ये बैठकीत शाब्दिक वादावादी झाली.
खडकवासला धरण साखळीमध्ये सध्या ५.६५ टीएमसी पाणी शिल्लक आहे. पुढील तीन महिन्यांत यातील सुमारे १.३५ टीएमसी पाण्याचे बाष्पिभवन होणार आहे, तर पुणे शहराला या धरणांमधून ३.९० टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे धरणांमध्ये केवळ ०.४० टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. दौंड शहर व जिल्ह्याला ०.५० टीएमसी पाणी द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातूनही पाण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पुण्याला पुरवठा होणाऱ्या कालव्याची गळती थांबली आणि नळबंद योजनेतून पाणी घेण्यास सुरुवात केली, तर सुमारे ०.५० टीएमसी पाणी शिल्लक राहू शकते, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. त्याचबरोबर सध्याचा शिल्लक पाणीसाठा पाहता पुणे शहरात अजून थोडी पाणीकपात केली, तर जिल्ह्यात इतर टंचाईग्रस्त भागांमध्ये पाणी पुरविता येईल. त्यामुळे महापौरांनी पुढाकार घ्यावा आणि पाणीकपात वाढवावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी सौरभ राव आणि आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिला. या प्रस्तावास महापौर जगताप यांनी तातडीने विरोध केला.
कालवा समिती बैठकीत पालिकेला कालवा गळतीची पाहणी करून, गळतीची ठिकाणे शोधण्यास सांगितले होते, ते झाले आहे का, अशी विचारणा पालकमंत्री बापट यांनी महापौर व पालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी व्ही. जी. कुलकर्णी यांना केली. त्यावर अशी पाहणी करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पालकमंत्री संतप्त झाले.
पुण्याचे पाणी कोणालाच
देणार नाही : महापौर जगताप
सध्या खडकवासला धरण साखळीमध्ये असलेले पाणी हे पुणे शहराचे हक्काचे पाणी आहे. दिवसाआड पाणीपुरवठा करून पाण्याची ही बचत करण्यात आली आहे. त्यामुळे त्यावर केवळ पुणेकरांचाच हक्क आहे. ग्रामीण भागासाठी जे दीड टीएमसी पाणी मागितले जात आहे, ते व्यवहार्य नाही. जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे नियम सांगितले, त्याचेच आम्ही पालन केले आहे. दौड व इंदापूरसाठी जे पाणी सोडण्याचा आग्रह केला जात आहे ते पाणी बाष्पीभवन, कालव्यांच्या नादुरुस्तीमध्येच, मोटारपंपाने पाणी उचलणे या साऱ्या बाबींचा विचार करता पोहोचू शकत नाही. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी की शेतीसाठी, हे स्पष्ट होत नाही. सध्या खडकवासला धरणात जे पाणी आहे ते केवळ पुणे शहरालाच लागणार आहे. पक्षनेत्यांच्या बैठकीतही मी हीच बाजू मांडणार आहे, अशी भूमिका महापौर प्रशांत जगताप यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितली.
बुधवारी करणार कालव्याची पाहणी : पालकमंत्री बापट
पुणे शहरासाठी खडकवासला धरणातून कालव्यातून जो पाणीपुरवठा होतो, त्या कालव्यातून अनेक ठिकाणी पाणीगळती होत आहे. कालवा समितीच्या बैैठकीत पालिकेला गळती रोखण्याबाबत सूचना केल्या होत्या; मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. मी स्वत: जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी या गळतीची बुधवारी पाहणी करणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. त्यानंतर काय उपाय योजना करता येतील याबाबत निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.
‘‘पाणीगळतीबाबत पालिका बेफिकीर आहे. याबाबत मी अनेकदा महापौर, आयुक्त, पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सांगितले; मात्र ते ऐकतच नाहीत; पण मला पूर्ण जिल्ह्याची काळजी करायची आहे. त्यामुळे ही पाणीगळती पाहण्यासाठी आणि नळबंद योजनेचे काम किती झाले, हे पाहण्यासाठी मी प्रत्यक्षात जातो,’’ असे सांगत, ‘‘मी सारखी भीक मागायला तुमच्या दारात येणार नाही,’’ अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी महापौरांना सुनावले.