दुष्काळग्रस्तांसाठी पाण्याची व्यवस्था
By Admin | Published: May 18, 2016 01:10 AM2016-05-18T01:10:27+5:302016-05-18T01:10:27+5:30
दोन घागरी पाणी मिळविण्यासाठी नागरिक सर्व कामे सोडून दिवसभर पाण्याची वाट पाहत बसत आहेत.
बिबवेवाडी : उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांमध्ये पिण्याचे दोन घागरी पाणी मिळविण्यासाठी नागरिक सर्व कामे सोडून दिवसभर पाण्याची वाट पाहत बसत आहेत. एवढा प्रचंड भीषण दुष्काळ या भागात असताना, दि पूना मर्चंटच्या वतीने वाशी तालुक्यातील ५ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.
वाशी तालुक्यातील पारगाव, जनकापूर, रुई, वायसेवस्ती, आनंदनगर, पवारवस्ती या भागात राहणाऱ्या सुमारे १० हजारांहून अधिक नागरिकांची तीव्र उन्हातील तहान भागविण्याचा निर्णय चेंबरने घेतला आहे. दररोज ३ पिण्याच्या पाण्याचे टँकर १ मे २०१६ पासून सुरू करण्यात आले होते. लाइटच्या त्रासामुळे हे पाणी नागरिकांपर्यंत पोहोचविणे देखील अवघड जात होते. चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, विजय नहार, अमित नहार यांनी या ठिकाणची पाहणी केली व त्यांनतर तातडीने ५ पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या. तसेच १६ मेपासून दररोज ४ पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत.
प्रत्येक घरात २ घागरी या पद्धतीने या ठिकाणी पिण्याचे पाणी पारगाव जैन संघटनेच्या सहकार्याने वाटप करण्यात येत आहे. दरम्यान, या भागात आणखी मदतीची आवश्यकता असून, अनेक संस्थांनी पुढे यावे, असे आवाहनदेखील त्यांनी या वेळी केले आहे. (वार्ताहर)