Pune: जलशुद्धीकरण यंत्रणा कोलमडली; जलकेंद्राचा वीजपुरवठा खंडित, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 01:13 PM2024-08-30T13:13:00+5:302024-08-30T13:13:39+5:30
पर्वती जलकेंद्र पूर्णच बंद पडल्याने शहरातील सर्व मध्यवर्ती पेठांसह शहराच्या अर्ध्या भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत
पुणे: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्वती, खडकवासला, पद्मावती, वारजे, लष्कर, चतु:शृंगी जल शुध्दीकरण केंद्राचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे महापालिकेची जलशुद्धीकरण यंत्रणा कोलमडली आहे. ऐन पावसाळ्यात सातत्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.
शहरात अनेक भागांत भूमिगत वीज वाहिन्या आहेत. त्यामुळे मुसळधार पावसाने पाणी साचत असून त्याचा फटका वीज पुरवठ्यावर होत आहे. त्यामुळे जलकेंद्रांना वीजपुरवठा करणारी केबल जळणे, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होणे, यामुळे सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत आहे. यामुळे पंपिंग स्टेशन बंद होतात. त्यामुळे पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्याची वेळ पाणीपुरवठा विभागावर येते. यामुळे अर्ध्या शहरातील नागरिकांच्या रोषाला पाणीपुरवठा विभागाला सामोरे जावे लागत आहे. वीज खंडित झाल्याने मंगळवारी अनेक भागांतील पाणीपुरवठा बंद होता. तसेच उशिरा आणि कमी दाबाने पाणी आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. हे प्रकार वारंवार होत असल्याने महापालिका प्रशासनही हतबल झाले आहे. पर्वती जलकेंद्राच्या जुन्या आणि नव्या केंद्राची क्षमता ६१० एमएलडी असून लष्कर जलकेंद्रातून सुमारे दीडशे एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. पर्वती जलकेंद्र पूर्णच बंद पडल्याने शहरातील सर्व मध्यवर्ती पेठांसह शहराच्या अर्ध्या भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.