पालखी सोहळ्यावर पाणीटंचाईचे सावट
By admin | Published: June 17, 2017 03:31 AM2017-06-17T03:31:29+5:302017-06-17T03:31:29+5:30
पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांना वरदान ठरलेले वीर धरण कोरडे पडले आहे. धरणामध्ये अवघा ०.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाल्हे : पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांना वरदान ठरलेले वीर धरण कोरडे पडले आहे. धरणामध्ये अवघा ०.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. माऊली पालखी सोहळा व संत सोपानकाका पालखी सोहळा याच्याबरोबरचा समाज वाढत आहे.
पालखी सोहळा २३ जूनला वाल्हे येथेयेणार आहे. येथून पुढे नीरापासून पंढरपूरपर्यंत पालखी सोहळ्याला पाणी सोडावे लागते. सोहळा वाल्हे तेथून पुढे नीरा येथे माऊलींच्या पादुकांना नीरा नदीवर पवित्र स्नान घातले जाते. लाखो वारकरीही यामध्ये स्नान करतात. मात्र धरणामध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळे दोन्ही पालखी सोहळ्याला पाणी मुबलक मिळणार नाही. गतवर्षी धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे गुंजवणी, भाटघर, नीरा-देवघर व वीर ही चारही धरणे शंभर टक्के भरली होती. पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे धरणातील पाणीसाठा पूर्ण कमी झाला आहे. तुटपुंज्या पाण्यावर सोहळा पार पाडावा लागणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी धरणामध्ये पाणीसाठा कमी आहे. तो सगळा गढूळ पाणीसाठा असल्यामुळे ते पाणी खाली सोडले तरी वारकरी व भाविकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण होऊ शकतो.
- अद्याप पावसाने या परिसरात हजेरी लावली नाही. जून, जुलैमध्ये पाऊस पडला नाही तर या क्षेत्रातील लाभधारकांनाही मोठ्या पाणी संकटाला सामोरे जावे लागेल. पालखी सोहळ्यासाठी आम्ही भाटघर व नीरा देवधर याही धरणांतील पाणी वापरणार आहे. सोहळ्याला पाणीपुरवठा कमी पडून देणार नसल्याचे वीर धरण शाखा अभियंता व्ही. बी. मंत्री यांनी सांगितले.