उजनी धरणातील पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:11 AM2021-05-21T04:11:50+5:302021-05-21T04:11:50+5:30

भाजप नेत्यांची मागणी : १५ वर्षांपासूनच्या पाणी वाटपाची माहिती घ्या लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : उजनीचे पाच टीएमसी ...

Water from Ujani dam | उजनी धरणातील पाणी

उजनी धरणातील पाणी

Next

भाजप नेत्यांची मागणी : १५ वर्षांपासूनच्या पाणी वाटपाची माहिती घ्या

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : उजनीचे पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय जलसंपदामंत्र्यांनी घेतल्यानंतर पाण्याचा वाद चांगलाच पेटला आहे. या वादात आता भाजप नेत्यांनी उडी घेतली आहे. उजनी धरणातील पाणी वापराचे गेल्या १५ वर्षांचे ऑडिट करावे, अशी मागणी भाजप किसान मोर्चा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख माऊली चवरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

उजनी धरण उभारणीसाठी भरीव योगदान देणाऱ्या इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र, तालुक्यातील जनतेच्या विरोधात जाणूनबुजून जनमत तीव्र करण्याचे काम वनमंत्री विभागाचे राज्यमंत्री तसेच सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी केले, असा आरोप चवरे यांनी केला आहे.

चवरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील ६३ हजार एकर शेतीसाठी पाच टीएमसी पाणी उजनीतून उचलून देण्यात यावे, असा निर्णय घेतला होता. १९९५ पासून सातत्याने ही मागणी करण्यात येत होती. वास्तविक पाहता हा निर्णय प्रत्यक्षात यायला चार ते पाच वर्षे लागणार आहेत, असे असताना सोलापूरचे पालकमंत्री असणाऱ्या भरणे यांच्या या निर्णयाला सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक विरोध झाला. इंदापूर तालुक्यातील जनतेच्या विरोधात वातावरण तापवले गेले. उजनी धरण उभे राहताना सर्वाधिक विस्थापित इंदापूर येथील आहेत. ५० वर्षे झाली, तरी विस्थापितांना अद्याप न्याय मिळालेला नाही, ही दुर्दैवी बाब आहे. ११७ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या या धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा ६३ टीएमसी इतका प्रचंड आहे. हे पाणी सोलापूर जिल्हा तसेच दक्षिण अहमदनगर जिल्ह्यातील काही भाग यांची तहान भागविण्यासाठी तसेच भीमा-सिना प्रकल्प, औद्योगिक वसाहती यासाठी वापरले जाते. पुणे तसेच पिंपरी चिंचवड या अफाट लोकसंख्या असलेल्या दोन शहरांसाठी खडकवासला धरण साखळीतील २१ ते २३ टीएमसी इतके पाणी पुरेसे होते. याच पाण्यातून दौंड, इंदापूर, शिरूर तालुक्यातील तलावही भरून घेतले जातात. दौंड तसेच शिरुर तालुक्यातील शेतीसाठी खडकवासला प्रकल्पातून पाणी दिले जाते. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातील तब्बल ६३ टीएमसी पाणी कुठे जिरते? याचे आॅडिट करणे, गरजेचे झाले आहे.

चौकट

उजनीचा मृत पाणीसाठा हा खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या साठवण क्षमतेपेक्षा अधिक आहे. असे असताना पुणे जिल्ह्याच्या तुलनेत कमी लोकसंख्या असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील क्षेत्राला ६३ टीएमसी पाणी का पुरत नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गेल्या १५ वर्षांचे पाणी वापराचे ऑडिट केले, तर उजनीचे पाणी कुठे जिरते, याचे उत्तर मिळेल, असे माऊली चवरे यांनी म्हटले आहे.

Web Title: Water from Ujani dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.