‘पवने’चे पाणी पुन्हा पेटणार
By admin | Published: May 3, 2016 03:29 AM2016-05-03T03:29:38+5:302016-05-03T03:29:38+5:30
पवना धरणाचे पाणी शेतीसाठी बंद करण्याच्या निर्णयाला शेतकऱ्यांसह सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शेतीचे पाणी अडवले, तर पवना बंद जलवाहिनीच्या आंदोलनापेक्षा
पवनानगर : पवना धरणाचे पाणी शेतीसाठी बंद करण्याच्या निर्णयाला शेतकऱ्यांसह सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शेतीचे पाणी अडवले, तर पवना बंद जलवाहिनीच्या आंदोलनापेक्षा मोठे आंदोलन छेडून पिंपरी-चिंचवडसाठी पवना नदीतून एकही थेंब पाणी जाऊ देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला दिला आहे.
पवना धरणाच्या ४५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मे महिन्यात इतका कमी पाणीसाठा आहे. मात्र, तो इतकाही कमी नाही की, ज्यामुळे शेतीचे पाणी अडवणे गरजेचे आहे. या वर्षी पवना धरणात २५ टक्के इतका पाणीसाठा आहे, तर उपयुक्त साठा ६०.४५ घनमीटर इतका आहे. सध्याची पाणी पातळी १९७६.८० फूट इतकी आहे. याचा विचार करून मागील वर्षी ३० एप्रिलअखेर पवना धरणात ४१ टक्के पाणीसाठा होता, तर पाणी पातळी १९८६.६० इतकी होती. मागील वर्षीच्या तुलनेत १६ टक्के इतका पाणीसाठा कमी आहे. १० फूट इतकी पाणी पातळी कमी आहे.
याचा विचार करता शिल्लक पाणीसाठा हा किमान दोन महिने पुरू शकतो. सध्या धरणातून १२०० क्युसेकने सहा तास पाणी सोडले जात आहे. हे पाणी पिंपरी-चिंचवड शहराला पिण्यासाठी वापरले जाते. शेतकरीदेखील पाणी वापरत आहेत. मात्र प्रशासन जाणीवपूर्वक शेतीचे पाणी बंद करत असून, त्याला शेतकऱ्यांसह सर्वच राजकीय संघटनांचा तीव्र विरोध आहे. यामुळे पवनेचे पाणी पुन्हा पेटणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात कपात केली जावी व मेअखेर शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिले जावे, यावर शेतकरी ठाम आहेत.
पवना धरणात सध्या पुरेसे पाणी आहे. पाणीकपात करून पिंपरी-चिंचवडला पिण्यासाठी व पवना मावळच्या शेतीला पाणी देणे शक्य आहे. सध्याचा २५ टक्के पाणीसाठा असाच विसर्ग सुरू ठेवल्यास जूनअखेर पुरेल. त्यामुळे पाटबंधारे विभागाने निर्णय बदलावा अन्यथा शेतीचे मोठे नुकसान होईल व शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल. यामुळे पाणी बंद केल्यास आम्ही पिंपरी-चिंचवडला पाण्याचा एक थेंब देखील पाणी जाऊ देणार नाही. प्रसंगी तीव्र आंदोलन छेडू.
- पांडुरंग ठाकर
संचालक, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना
आम्ही पाणी बंद करू देणार नाही. प्रथम प्रशासनाने पाणीकपात करावी. वाया जाणाऱ्या पाण्यावर निर्बंध आणावेत. पाणी बंदचा विचार केल्यास तीव्र आंदोलन करून नदीतून एक थेंबही पाणी जाऊ देणार नाही.
- काशिनाथ ढोरे,
अध्यक्ष, किसान आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस
धरणाचे पाणी हे प्रथम शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. महावितरणला सांगून पाणी बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय पूर्ण चुकीचा आहे. पाणी बंद केले तर शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरू व शहराला पाणी जाऊ देणार नाही.- यशवंत मोहळ, तालुका कार्याध्यक्ष, काँग्रेस
पाणी हे प्रथम शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे. पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास विरोध नाही. मात्र,पाणीकपात करून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिलेच पाहिजे. शेतीचे पाणी बंद केले, तर शिवसेना पाटबंधारे विभागाचा एकही अधिकारी इकडे फिरकू देणार नाही. पाणीकपात करून सर्वांना पाणी मिळावे.- सुरेश गुप्ता, शिवसेना शहरप्रमुख
सध्या धरणात पुरेसे पाणी आहे. पाणी बंद करू नये. शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे कर्ज घेऊन पॉलिहाऊस उभे केले आहेत. पाणी बंद केले तर रोपे मरून जातील. शेतकरी एवढे कर्ज कसे फेडणार? पाणी बंद झाल्यास शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागेल. याचा विचार करून निर्णय घ्यावा.
- मुकुंद ठाकर,
अध्यक्ष, पवना फुलउत्पादक संघ
शेतकऱ्यांच्या शेतीचे पाणी बंद करून शासनअन्याय करीत आहे. तो सहन करणार नाही. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करून धरणावर शेतकऱ्यांचा ताबा ठेवेल. पाणी बंद करण्याऐवजी पाणीकपात करा. पिंपरी-चिंचवड व मावळवासीयांना समान न्याय द्या. पाणी बंद करायचे असेल, तर शेतीचा पंचनामा करून त्यांना पूर्ण भरपाई द्या, मगच पाण्याचा निर्णय घ्या.
- महादेव कालेकर,
माजी संचालक, संत तुकाराम साखर कारखाना