तुम्ही पीत असलेले पाणी दूषित तर नाही ना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:13 AM2021-09-09T04:13:41+5:302021-09-09T04:13:41+5:30
पुणे : दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांची संख्या खूप मोठी आहे. विशेषत: पावसाळ्यात पाण्यातून पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण मोठे असते. दूषित ...
पुणे : दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांची संख्या खूप मोठी आहे. विशेषत: पावसाळ्यात पाण्यातून पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण मोठे असते. दूषित पाण्यामुळे संसर्ग होऊन जुलाब, उलट्या, तीव्र पोटदुखी, असे त्रास उद्भवतात. विषाणूजन्य आजारांच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढते. त्यामुळे पावसाळ्यात उकळून गार केलेले स्वच्छ आणि ताजे पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक ठरते.
पावसाळ्यात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार, तसेच दूषित पाण्यामुळे कावीळ, लेप्टोस्पायरोसिस, ग्रॅस्ट्रो, टायफॉइड अशा आजारांना आमंत्रण मिळते. पावसाळ्यात पाणीपुरी, भेळ, वडापाव, असे उघड्यावरील पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडते, उलट्या होतात. उघड्यावरील पदार्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे या समस्या उद्भवतात. त्यामुळे या दिवसांमध्ये उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावे. दूषित पाण्यामधूनही अनेक आजार पसरतात. त्यामुळे ताजे आणि उकळलेले पाणी प्यावे. पावसात भिजल्याने त्वचा खूप काळ ओली राहते. त्यामुळे पुरळ येणे, त्वचेला खाज सुटणे, केस चिकट होणे, केस गळणे, असेही त्रास होतात.
दूषित पाण्याच्या सेवनामुळे अतिसार, जुलाब असा त्रास होत असल्यास रुग्णांना हलका आणि द्रवस्वरूपातील आहार देण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. आजारपणाच्या काळात तोंडाची चव जाते किंवा अन्नावरील वासनाही उडते. अशा वेळी रुग्णांना भाज्यांचे सूप, भाताची पेज, वरणावरील पाणी, असा आहार देणे लाभदायक ठरते. डाळिंबाचे दाणे खाल्ल्याने अन्नावरील वासना परत येण्यास मदत होते. संत्री, मोसंबी ही फळेही लाभदायक ठरतात.
----------------
पावसाळ्यात विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती उत्तम राखणे आवश्यक असते. त्यामुळे आहार आणि व्यायामाची पथ्ये पाळणे आवश्यक असते. या हंगामात तेलकट, मसालेदार पदार्थ टाळावेत. हिरव्या पालेभाज्या, सलाद यांचा समावेश करावा. दररोज सकाळी अर्धा तास व्यायाम करावा. पावसामुळे घराबाहेर पडणे शक्य नसल्यास घरच्या घरी योगासने करावीत.
-डॉ. रवींद्र सबनीस, पोटविकारतज्ज्ञ
----------------------
पावसाळ्यात काय काळजी घ्यावी?
- पावसाळ्याच्या दिवसांमध्ये उकळून थंड केलेले, गाळलेले स्वच्छ पाणी प्यावे. पाणी उकळून प्यायल्याने त्यातील जंतू नष्ट होतात.
- घरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात पाणी जास्त काळ साठू देऊ नये; अन्यथा त्यामध्ये डासांची उत्पत्ती ठिकाणे वाढतात आणि डेंग्यू, मलेरिया, टायफॉइडसारख्या आजारांना आमंत्रण मिळते.
- आंघोळीच्या पाण्यात अँटिसेप्टिक लिक्विड घातल्यास दूषित पाण्यामुळे होणारे त्वचारोग टाळता येतात.
- उघड्यावरील पदार्थ तसेच अर्धवट शिजलेले पदार्थ खाणे टाळावे.