तक्रारवाडीचे पाण्याचे एटीएम महागच!
By admin | Published: April 25, 2015 05:02 AM2015-04-25T05:02:30+5:302015-04-25T05:02:30+5:30
तक्रारवाडी (ता. इंदापूर) येथे नव्याने बसवण्यात आलेल्या पाण्याच्या एटीएम मशीनमुळे ग्रामस्थांचे खिसे रिकामे होत आहेत
भिगवण : तक्रारवाडी (ता. इंदापूर) येथे नव्याने बसवण्यात आलेल्या पाण्याच्या एटीएम मशीनमुळे ग्रामस्थांचे खिसे रिकामे होत आहेत. पाण्याचा लिटरचा दर २५ पैशांवरून प्रतिलिटर १० पैसे करावा, अशी मागणी केली जात आहे.
इंदापूर तालुका आणि परिसरात शुद्ध पाणीपुरवठा करणारी पहिलीच योजना तक्रारवाडी येथे कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे गावाला शुद्ध पाणीपुरवठा होऊ लागला. ही योजना कायमस्वरूपी चालावी यासाठी त्या वेळच्या पाणीवाटप समितीने प्रत्येक कुटुंबाला महिना १०० रुपयेप्रमाणे कर आकारला होता. त्यातून शुद्ध पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. या करातून आॅपरेटर पगार जाऊन काही पैसे शिल्लक राहत होते. यानंतर या कारभारात पारदर्शकता यावी, यासाठी एटीएम मशीन बसविण्यात आले. या मशीनमधील पाणी २५ पैसे प्रतिलिटरप्रमाणे देण्यात येऊ लागले. परंतु, त्यामुळे मोठ्या कुटुंबाला महिन्याला ५०० ते १००० रुपयांचा भुर्दंड बसू लागला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटला जात आहे.
पाण्याचा प्रतिलिटर दर कमी करावा, अशी मागणी होत आहे. इतर ठिकाणी अशा योजनेसाठी प्रतिलिटर १० पैसे दर आकारला जात आहे. त्याप्रमाणे दर आकारला जावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. तसेच ही योजना फक्त तक्रारवाडी गावासाठी आहे. त्यामुळे त्याचा लाभ गावातील ग्रामस्थांनाच मिळावा. बाहेरगावी राहणाऱ्या लोकांचा येथे त्रास होत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने योग्य ती कारवाई करावी, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)