‘उजनी’च्या पाण्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:21 AM2021-09-02T04:21:43+5:302021-09-02T04:21:43+5:30

नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची भीती नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची भीती पळसदेव : उजनी जलाशयातील पाण्यावरती गडद हिरव्या ...

On the waters of Ujani | ‘उजनी’च्या पाण्यावर

‘उजनी’च्या पाण्यावर

Next

नागरिकांच्या आरोग्याला

धोका होण्याची भीती

नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची भीती

पळसदेव : उजनी जलाशयातील पाण्यावरती गडद हिरव्या रंगाचा तवंग निर्माण झाला आहे. हे पाणी पिण्यास तर सोडा, परंतु वापरण्यासही अशक्यप्राय बनले आहे. उजनीतील पाण्याला दुर्गंधी निर्माण झाली आहे. हे पाणी विषासमान बनल्याची भावना नागरिकांमध्ये पसरली आहे.

पुणे, सोलापूर आणि नगर या तीन जिल्ह्यांसह लातूर उस्मानाबाद जिल्ह्यांनादेखील उजनीचे पाणी पुरवले जाते. या भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी वरदान असलेले उजनी धरण सध्या शाप बनले आहे. धरणातील पाण्याच्या आधारावर गेले काही दशकांपासून राजकारण करणाऱ्या अनेकांनी विकासाच्या नावाखाली अनेक कंपन्या उभ्या केल्या. मात्र, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, कुरकुंभ एमआयडीसी भागातील अनेक केमिकल व रासायनिक कंपन्या यातून निघणारे रसायन व केमिकलयुक्त पाणी प्रक्रिया न करताच उजनीच्या पाण्यात सोडून देत आहेत. परिणामी उजनीतील धरणाचे पाणी प्रदूषित झाले आहे. जलचर प्राण्याचे जीवनदेखील धोक्यात आले आहे.

पाणी शुद्ध करण्यासाठी मोठा खर्च येत असल्याने, तो वाचण्यासाठी त्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याऐवजी ते पाणी साठवून ठेवतात. तसेच, पावसाच्या दिवसांत नजीकच्या ओढ्या, नाल्यात सोडून दिले गेले. परिणामी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हेच प्रदूषित पाणी गेली पंधरा ते वीस वर्षांपासून उजनी धरणात येऊ लागल्याने या पाण्याचे दुष्परिणाम हळूहळू दिसू लागले. अनेक तालुक्यांची जीवनदायिनी असणाऱ्या उजनीतील पाणी प्रदूषित झाले आहे. याबाबत अनेक अहवाल शासनाला सादर केले आहे. मात्र परिस्थिती कायमच आहे. प्रदूषण मंडळाचे अधिकारी उजनीच्या प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या कंपन्यांकडे दुर्लक्ष का करतात, हा सवाल सध्या तरी निरुत्तरीतच आहे.

आता उजनीचे पाणी गडद हिरव्या रंगाच्या आॅइल पेंटप्रमाणे दिसत आहे. किनाऱ्यापासून मध्य भागापर्यंत हा हिरवट रंगाचा सायटा पसरलेले दिसत आहे. या विषारी प्रदूषित पाण्यामुळे उजनी धरणातील अनेक मासळीच्या जाती तर नष्ट झाल्याच आहेत. शिवाय धरणात येणाऱ्या अनेक पाणवनस्पतीही नष्ट झाल्या आहेत. तसेच या प्रदूषित पाण्यामुळे शेतीचा कस बिघडत चालला आहे.

उजनी धरणावर अनेक पाणी योजना कार्यान्वित आहेत, तर अनेक प्रास्ताविक आहेत. उजनीचे हे दूषित पाणी पिऊन नागरिकांच्या आतड्यांना सूज येणे, किडनी खराब होणे, मुतखडा होणे, शरीरावर डाग येणे, अंगाला खाज सुटणे यांसारखे आजार मोठ्या प्रमाणात असलेले रुग्ण उजनी काठावरील गावात आढळत असल्याचे पळसदेव येथील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अशोक होरणे यांनी सांगितले.

चौकट

दूषित मळीमिश्रित व केमिकलयुक्त पाणी धरण परिसरात सोडत असलेल्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करून उजनीतील पाणी प्रदूषण रोखण्याची आवश्यकता आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व प्रशासन केवळ बोटचेपे धोरण राबवण्यापलीकडे काहीच करत नसल्याचे वास्तव आहे. आज उजनीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

फोटो : उजनी धारांच्या पाण्यावर आलेला हिरवट तवंग

३१०८२०२१-बारामती-११

Web Title: On the waters of Ujani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.