मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पाण्याचे पाट; अमृतांजन पूल परिसरात साचले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 08:12 AM2024-07-15T08:12:28+5:302024-07-15T08:12:37+5:30
एक्स्प्रेस-वेवर असलेल्या चढावर पाणी साचल्याने अनेक वाहने बंद पडली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
लोणावळा : लोणावळा शहर व खोपोली घाट माथ्यावर मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रविवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेलादेखील बसला. अमृतांजन पुलाच्या खालील बाजूला असलेल्या उतारावरून पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस-वेच्या मार्गिकेवर अक्षरशः पाण्याचे पाट वाहत होते. रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करीत पाण्यातून ही हलकी चढण चढण्याची वेळ आली.
एक्स्प्रेस-वेवर असलेल्या चढावर पाणी साचल्याने अनेक वाहने बंद पडली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या ठिकाणी यापूर्वी असे प्रकार कधीही घडलेले नाहीत. मात्र, रविवारी या भागात कोणत्या कारणामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले, याचा शोधही घेतला जात आहे.
घाट माथ्यावर जोरदार पाऊस
लोणावळा घाट माथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे. शनिवारी २४ तासांमध्ये या भागात २१६ मिमी, तर रविवारी दिवसभरामध्ये १४० मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर घाट माथ्यावर वाढत असल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात पाणी वाट मिळेल त्या बाजूला वाहत होते.