जलसाठ्यांनी गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 01:45 AM2019-01-29T01:45:08+5:302019-01-29T01:45:17+5:30
पाण्यासाठी नागरिकांना करावी लागतेय पायपीट
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणाऱ्या पाण्याच्या जलस्रोतांनी व पाण्याच्या साठ्यांनी यावर्षी जानेवारी महिन्यातच तळ गाठले आहेत. यामुळे या भागातील आदिवासी बांधवांना लवकरच दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे. पाण्यासाठी या परिसरात टँकरची मागणी वाढू लागली आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे खोरे परिसर मुसळधार पडणाºया पावसाचे माहेरघर समजला जातो. पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये या भागामध्ये मुसळधार पाऊस पडला जातो. परंतु उन्हाळ्यामध्ये या भागातील आदिवासी लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. वर्षानुवर्षे या भागातील लोकांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
महत्त्वाचे म्हणजे या भागामध्ये असणाºया विहिरी, शिवकालीन टाक्या, बुडीत बंधारे, तळी, शेततळी हे मुख्य असणारे जलस्रोत या भागामध्ये पडणाºया मुसळधार पावसामध्ये तुडुंब भरतात. परंतु उन्हाळ्यामध्ये या जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहत नाही. या परिसरामध्ये काढण्यात आलेल्या कूपनलिकांमध्ये पाण्याचा थेंबही राहत नाही. वर्षानुवर्षे या भागातील आदिवासी जनता दुष्काळाचे हाल सोसत आहे. पावसाळ्यामध्ये भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोºयामध्ये मुसळधार पाऊस पडतो. परंतु उन्हाळ्यामध्ये या भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. पाण्यासाठी या भागातील आदिवासी महिलांना मैलोन्मैल पायपीट करावी लागते. श्रीक्षेत्र भीमाशंकर व परिसरासाठी वरदान ठरलेल्या तेरुंगण (आंबेगाव) येथील पाझर तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाºया श्रीक्षेत्र भीमाशंकर व परिसरातील गावांना लवकरच पाणीटंचाईशी सामना करावा लागणार आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये जसजसा उन्हाळा जाणवू लागला आहे तसतशा उन्हाळ्याच्या झळा या भागामध्ये सोसाव्या लागत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे या भागातील आदिवासी बांधवांना तीव्र दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे. दरवर्षी या भागातील आदिवासी जनतेला एप्रिल, मे महिन्यामध्ये दुष्काळाशी सामना करावा लागत होता; परंतु यंदा याआधीच पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे. डिंभे धरण आदिवासी भागाच्या उशाला असून कित्येक वर्षे आदिवासी जनतेच्या घशाला कोरड पडली आहे. या भागात असणाºया विहिरी, शिवकालीन टाक्या, बुडित बंधारे, तळी, शेततळी हे मुख्य असणारे जलस्रोत जानेवारी महिन्यातच आटू लागून तळ गाठू लागली आहेत. हे जलस्रोत या भागामध्ये जीवनदायी ठरत असल्याने ते आटू लागल्यामुळे पुढील काळासाठी आदिवासी बांधवांपुढे दुष्काळाविषयी मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या भागातील जनतेबरोबरच जित्राबांनाही या दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे.