बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 11:57 AM2021-06-02T11:57:16+5:302021-06-02T15:26:26+5:30
जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी गेले वाया; नागरिकांच्या घरात शिरले पाणी
बारामती : बारामती तालुक्यातील म्हेत्रे वस्तीत शिरसाई कालव्याला जाणारी जलवाहिनी बुधवारी सकाळी अतिदाबामुळे अचानक फुटली. पाणी येथील नागरिकांच्या घरात शिरले आहे. जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. येथील शेतक-यांच्या घरात आणि शेतात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
मागील दोन दिवस या भागात पाऊस पडत आहे. शेतात पाणी असताना जलवाहिनी फुटली. यातून लाखो लिटर पाणी गळती झाली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. पाण्यापासून घरातील सामान वाचवण्यासाठी स्थानिकांची धावपळ सुरु आहे.
शिरसाई कालवा रेल्वेलाईन येथील जलवाहिनी फुटताना मोठा आवाज झाला. त्यामुळे घबराट पसरल्याचे चित्र होते. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मुरघासाचे नुकसान झालें आहे. अनेकांच्या गोठ्यात पाणी शिरल्याचे चित्र आहे. तर काही शेतक-यांच्या शेळ्या, कोंबड्या वाहून गेल्या आहेत. काही चारचाकी वाहने पाणी शिरल्याने बंद पडली आहेत.
या घटनेला जबाबदार कोण असा सवाल येथील स्थानिकांसह शेतकऱ्यांनी केला आहे. तर यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी असल्याचा आरोप येथील शेतकरी ,माजी सरपंच अतुल हिवरकर, आणि ग्रामस्थ यांनी केला आहे.