जिल्ह्यात म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला; आतापर्यंत ९० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:13 AM2021-06-16T04:13:12+5:302021-06-16T04:13:12+5:30

मेच्या तुलनेत रुग्णसंख्या झाली निम्म्याहून कमी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असून, ...

On the way back to mucorrhoea in the district; 90 killed so far | जिल्ह्यात म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला; आतापर्यंत ९० जणांचा मृत्यू

जिल्ह्यात म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला; आतापर्यंत ९० जणांचा मृत्यू

Next

मेच्या तुलनेत रुग्णसंख्या झाली निम्म्याहून कमी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असून, एका महिन्यात रुग्णसंख्येत निम्म्याहून अधिक घट झाली आहे. पुणे जिल्ह्यात एप्रिल महिन्यात म्युकरमायकोसिस ३५५ रुग्ण आढळून आले. मे महिन्यात यात चांगलीच वाढ झाली आणि रुग्णसंख्या ५२१ वर पोहोचली. परंतु, आता खऱ्या अर्थाने जिल्ह्यात म्युकरमायकोसिस आजार परतीच्या मार्गावर असून, एका महिन्यात रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात जून महिन्यात केवळ १९२ म्युकरमायकोसिस नवीन रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत ९० म्युकरमायकोसिस रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन्स, स्टेराॅईड आणि ऑक्सिजनच्या चुकीच्या पद्धतीने व अतिरेक वापर केल्याने रुग्णांवर अनेक दुष्परिणाम झाल्याचे समोर आले. याचाच एक भाग म्हणजे म्युकरमायकोसिस हा आजार असून पोस्ट कोविड रुग्ण या आजाराचे बळी ठरत आहे. म्युकरमायकोसिसमध्ये प्रामुख्याने डोळ्यांवरच सर्वाधिक परिणाम होताना दिसत आहेत. एप्रिल २०२१मध्ये जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. परंतु थोड्याच दिवसांत यात मोठी वाढ झाली. जिल्हा प्रशासनाने म्युकरमायकोसिस रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध करून देण्यासाठी घरोघरी जाऊन रुग्णांचे सर्वेक्षण केले. याचा चांगला परिणाम दिसून आला. या सर्वेक्षणामुळे मे महिन्यात रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली, तरी जून महिन्यात संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ९६८ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले असून, आतापर्यंत २४२ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर सध्या ६३६ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. तर म्युकरमायकोसिस आजारामुळे ९० रुग्णांनी जीव गमवला आहे.

--------

जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस रुग्णांची माहिती

कार्यक्षेत्र एकूण रुग्ण बरे झालेले उपचार सुरू मृत्यू

पुणे मनपा ४०६ ९७ २८० २९

पिं.चिं.मनपा २२७ ९३ ११० २४

पुणे ग्रामीण ४५ १५ २१ ९

ससून हाॅस्पिटल २९० ३७ २२५ २८

एकूण ९६८ २४२ ६३६ ९०

----------

म्युकरमायकोसिस वरील उपचारांच्या औषधांचा पुरेसा साठा

जिल्ह्यात एप्रिल-मे महिन्यात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या वेगाने वाढल्याने या रोगावर उपचार करण्यासाठी आवश्यक व उपयोग ठरणाऱ्या ॲम्फोटेरिसि-बी, आयट्राकोनॅझोल, फ्लुकोनॅझोल या औषधींचा साठा कमी पडू लागला व औषधे मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू झाली. याबाबत जिल्हा प्रशासन व शसनाच्या स्तरावर पाठपुरावा करून अखेर पुणे जिल्ह्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध झाला. जिल्ह्यात आता पर्यंत १२ हजार ८३८ ॲम्फोटेरिसिन इंजेक्शन्स व्हायल्स वाटप करण्यात आले आहे.

------

या लोकांना म्युकरमायकोसिस अधिक धोका

रोगप्रतिकारशक्ती कमी आणि अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या शरीरात ही बुरशी सहज प्रवेश करू शकते. रक्त आणि हाडांच्या पोकळीतून ही बुरशी पुढे सरकत जाते. नाकातून घशात, त्यानंतर दातांपर्यंत, डोळ्यांत आणि शेवटी मेंदूपर्यंत या बुरशीचा मार्ग असतो. पुढे जाताना ही बुरशी मागील रक्तवाहिन्यांचा पुरवठा बंद करते. त्यामुळे संबंधित रुग्णात आरोग्याच्या तक्रारी वाढत जातात.

-----------

म्युकरमायकोसिस रुग्णांनी ही काळजी घ्या

म्युकरमायोसिस हा एक बुरशीजन्य आजार असून शरीराच्या ज्या भागात याची लागण होते, त्याला तो नष्ट करतो. मात्र, वेळेत योग्य उपचार घेतल्यास यापासून वाचता येऊ शकते. तसेच या रोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तीने बांधकाम सुरू असलेले ठिकाण किंवा धूळ असलेल्या परिसरात जाणे टाळावे. गार्डनिंग किंवा शेती करताना लांब बाह्या असलेले मोजे (ग्लब्ज) घाला. ज्या ठिकाणी पाणी साचलेले आहे अशा ठिकाणी जाणे टाळा. ज्यांना कोरोना होऊ गेला आहे त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. कोरोनामुक्त झाल्यानंतरही नियमित चेकअप करत राहा. बुरशीचे (fungus) कुठलेही लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. त्यामुळे या बुरशीवर वेळेतच उपचार होतील.

------

घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात

जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीन विशेष सर्वेक्षण मोहीम हाती घेऊन घरोघरी जाऊन म्युकरमायकोसिस लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी केली. यात प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णांना त्वरित उपचारासाठी दाखल केले. यामुळेच आता जिल्ह्यात रुग्ण संख्या खूपच कमी होताना दिसत आहे.

- डाॅ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: On the way back to mucorrhoea in the district; 90 killed so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.