शहराची वाटचाल कंटेनरमुक्तीकडे

By admin | Published: December 31, 2014 12:07 AM2014-12-31T00:07:43+5:302014-12-31T00:07:43+5:30

ओला व सुका कचरा वेगळा करून मिळत नसल्याने महापालिकेचे अनेक बायोगॅस प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू शकत नाहीत, यावर मार्ग काढण्यासाठी शहरातील सर्व कंटेनर हलविले जाणार आहेत.

Way to move the city to the container | शहराची वाटचाल कंटेनरमुक्तीकडे

शहराची वाटचाल कंटेनरमुक्तीकडे

Next

पुणे : ओला व सुका कचरा वेगळा करून मिळत नसल्याने महापालिकेचे अनेक बायोगॅस प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू शकत नाहीत, यावर मार्ग काढण्यासाठी शहरातील सर्व कंटेनर हलविले जाणार आहेत. त्याऐवजी पालिकेच्या घंटागाड्यांमधून व स्वच्छच्या माध्यमातून ओला व सुका कचरा गोळा केला जाणार आहे. त्याकरिता सर्व क्षेत्रीय कार्यालयांमधील १२५० कंटेनर हलविण्याच्या दिशेने पावले उचलण्यास प्रशासनाने युद्धपातळीवर सुरुवात केली आहे.
उरुळी देवाची येथे कचरा टाकण्यास तेथील ग्रामस्थांनी ३१ डिसेंबरची डेडलाइन दिली आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत कचरा टाकू दिला जाणार नाही, असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर शहरातला कचरा शहरातच जिरविण्याच्या दिशेने पावले उचलण्यास महापालिका प्रशासनाने सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील कंटेनर हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरात दररोज तब्बल सोळाशे ते अठराशे टन घनकचरा तयार होतो. मात्र, त्यातील बहुतांश कचऱ्याचे वर्गीकरण झाले नसल्याने तो बायोगॅस प्रकल्पांसाठी वापरता येत नाही. शहरामध्ये २२ बायोगॅस प्रकल्प कार्यरत आहेत. मात्र, वर्गीकरण झालेला कचरा मिळत नसल्याने ते पूर्ण क्षमतेने चालू शकत नाहीत.
घंटागाड्या तसेच स्वच्छ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ओला आणि सुका कचरा वेगळा जमा करण्याची योजना आखण्यात आली आहे. या पध्दतीने कचऱ्याचे वर्गीकरण झाल्यास कचऱ्याची ५० टक्के समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यासाठी महापालिकेने एकूण १६० घंटागाड्या तैनात केल्या आहेत.
विश्रामबागवाडा येथे अंमलबजावणी
विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय परिसरातील ४० कंटेनर हलवून त्याठिकाणी सुंदर रांगोळी सोमवारी काढण्यात होती. त्यानुसारच आता शहरातील सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमधील कंटेनर हलविले जाणार आहेत. त्याचबरोबर कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी बकेटचे वाटप करणे, नागरिकांचे प्रबोधन करणे आदी मार्ग अवलंबले जाणार आहेत.
(प्रतिनिधी)

कचराप्रश्नावर अन्नधान्य व पालकमंत्री गिरीश बापट यांनी सकाळी ११ वाजता महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. उरूळी देवाची येथील नागरिकांनी ३१ डिसेंबरनंतर कचरा टाकण्यास मनाई केल्याच्या प्रश्नावर या बैठकीमध्ये मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या बैठकीत कचराप्रश्नावर काही मार्ग न निघाल्यास नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांकडून कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाड्या अडविण्याचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सोसायट्यांमधील कचरा सोसायट्यांमध्येच जिरविण्यासाठी महापालिकेच्या वतीने सवलती देण्यात आल्या आहेत. त्याची कडक अंमलबजावणी यापुढील काळात केली जाणार आहे. स्वच्छ संस्थेमार्फत शहरातील ४० टक्के कचरा गोळा केला जातो आहे. आणखी जास्तीत जास्त प्रमाणात त्यांच्याकडून कचरा गोळा केला जाणार आहे. घंटागाड्यांची संख्या वाढविण्यासही प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचबरोबर नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून द्यावा, याकरिता त्यांचे प्रबोधन केले जाणार आहे.- दत्तात्रय धनकवडे, महापौर

Web Title: Way to move the city to the container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.