"आम्हीही मनुवादाविरुद्ध बोलतोच, पण याचा अर्थ कुणाच्या भावना दुखावणे असा होत नाही..! "
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 01:52 PM2021-02-04T13:52:08+5:302021-02-04T15:25:33+5:30
शरजिल उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल वापरलेले शब्द चुकीचे होते.
पुणे : पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी यांनी हिंदू समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना प्रक्षोभक भाषण केले होते. हिंदू समाजाचा अवमान केल्याप्रकरणी उस्मानी याच्यावर कडक कारवाई करण्याच्या उद्देशाने भाजपने आक्रमक पावित्रा घेत राज्य सरकार व गृहमंत्री यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. याप्रकरणी पुण्यात शरजिल उस्मानी याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड, आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील शरजील उस्मानी याला खडे बोल सुनावले आहे.
पुण्यात छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. भुजबळ म्हणाले, शरजिल उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल वापरलेले शब्द चुकीचे होते. आम्हीही मनुवादाविरुद्ध बोलतो. पण याचा अर्थ कोणाच्या भावना दुखावणे असा होत नाही.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री यांच्या भेटीवर छगन भुजबळ म्हणाले.....
काही दिवसांपूर्वी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार व यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथी गृहावर भेट घेतली होती. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यात बंद दरवाजाआड एक तास चर्चा झाली. बाहेर पडल्यावर मुनगंटीवार यांनी ही भेट मतदारसंघातील विविध विकास कामासंबंधी असल्याचे स्पष्ट केले असले तरी राजकीय वर्तुळात या भेटीवरून अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. याबाबत भाष्य करताना भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री राज्याचे आहेत. त्यांना कोणीही भेटु शकते. मुनगंटीवार भेटु शकतात, फडणवीस भेटू शकतात. मुनगंटीवारांना विचारा ते पक्षात येणार का म्हणून असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.
काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेकडे विधानसभेचे अध्यक्षपद याबाबत चर्चाच आहे. पण याबाबत ज्यावेळी चर्चा थांबेल तेव्हाच खरे ते काय बाहेर येईल.
धनंजय मुंडे प्रकरणावर भाष्य करताना भुजबळ म्हणाले, मुंडे यांच्या विरोधात पुन्हा तक्रार करण्यात आलीय. पण या आधी देखील जी तक्रार देण्यात आली होती ती पुन्हा मागे घेण्यात आली. त्या महिलेच्या विरोधातच अनेकांनी तक्रारी दिल्या .