आम्हीही माणसेच; मग आमची उपेक्षा का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 03:59 AM2018-05-20T03:59:31+5:302018-05-20T03:59:31+5:30
किन्नरांचा आर्त सवाल : पदरी अपमान नेहमीचाच, आमच्याविषयी गैरसमजच अधिक
पुणे : केवळ निसर्गाच्या करामतीने आम्हाला किन्नरांचे जिने जगावे लागत आहे़ जगण्यासाठी पैैसा हवा असतो, त्यासाठी आमच्यातील काही जण विशिष्ट पद्धतीने टाळी वाजवून अश्लील हवभाव करतात म्हणून आम्हाला दूर ठेवले जाते, आम्हीही तुमच्यासारखे माणसेच आहोत, मग समाजाकडून आमची उपेक्षा का केली जाते़, असा आर्त सवाल तृतीयपंथियांकडून विचारला जात आहे़
पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातही शासनाकडून तसेच समाजाकडून तृतीयपंथियांची उपेक्षा केली जाते़ त्यामुळे पदोपदी त्यांना हेटाळणी सहन करावी लागते़
सर्वोच्च न्यायालयाने २०११ मध्ये देशातील किन्नरवर्गाला तृतीयपंथी म्हणून लिंगओळख देण्याचा निर्णय दिला. त्यानंतर पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आदी शासकीय कागदपत्रांवरदेखील त्यांना ओळख मिळू लागली. मात्र, हा बदल केवळ कागदपत्रापुरताच मर्यादित असल्याचे दिसून आले आहे. अद्यापही तृतीयपंथी म्हटल्यास सर्वसामान्य माणसाच्या मनात त्याच्याबद्दल भीती आणि संशय बळावतो. आरोग्य, शिक्षण, रोजगार यात तृतीयपंथीयांच्या पदरात निराशा पडत असल्याची खंत अनेक तृतीयपंथी व्यक्त करतात. मागील काही महिन्यांपूर्वी सोनाली दळवी या तृतीयपंथी व्यक्तीला मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. या घटनेचे तीव्र पडसाद सामाजिक माध्यमांमध्ये उमटले होते. त्याची दखल घेवून मॉलच्या प्रशासनाने माफीदेखील मागितली. रोजगार, नोकºया याबाबत तृतीयपंथीयांवर अन्याय होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. नोकरीची कुठलीच संधी त्यांच्या वाट्याला येत नाही. इतर राज्यांमध्ये मात्र किन्नरांकरीता विविध अभिनव उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. मागील वर्षी तमिळनाडू राज्यात पोलीस भरतीकरिता तृतीयपंथीयांची निवड करण्यात आली. त्या निवड प्रक्रियेत उत्तीर्ण झालेले काही किन्नर हे आता पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करत आहेत.
पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रात याच्या उलट चित्र पाहवयास मिळते. समाजापासून वाळीत टाकल्या गेलेल्या या व्यक्तींना अर्थाजनाच्या कुठल्याच वाटा शिल्लक ठेवल्या नसल्याने त्यांना नाईलाजाने देहविक्री या व्यवसायाकडे वळत आहेत.
शासकीय सेवासुविधांचा अभाव
1राज्यात तृतीयपंथीयांकरिताच्या रोजगारासाठी जीआर पास नाही. दैनंदिन उपजीविकेसाठी काय करता, असं विचारल्यानंतर बºयाच किन्नरांकडे या प्रश्नाचे उत्तर नसते. मात्र, आम्ही शाळा, महाविद्यालये, इतकेच नव्हे तर अंगणवाडी, बालवाडी येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करण्यास तयारी असल्याचे असे त्यांचे म्हणणे आहे. आमच्याविषयी महिलांना नव्हे तर पुरुषांना भीती आहे. त्यांच्या मनात आमच्याविषयी गैरसमज आहेत. पहिल्यांदा आमच्याकडे माणूस म्हणून बघायला तयार झाल्यास अर्धी लढाई जिंकल्यासारखी असल्याची भावना तृतीयपंथीयांची आहे.
2तृतीयपंथीयांमध्ये प्रामुख्याने गुरू आणि चेला परंपरा आहे. यानुसार गुरुने उदरनिर्वाहासाठी काही करायला सांगितल्यास त्यानुसार कार्य करावे लागते. अनेकदा व्यवसाय म्हणून किराणा मालाची दुकाने सुरू केल्यानंतरदेखील केवळ ते दुकान एका तृतीयपंथीयाने सुरू केले आहे म्हणून खरेदी करण्यास टाळाटाळ केली जाते.
आमच्या हातचे जेवण चालणार नाही का?
धंदाच करतो आम्ही असं म्हणणाºयांना कामाची संधी देऊन तर बघा. कित्येक तृतीयपंथी कामाच्या शोधात आहेत. मात्र त्यांना काम दिले जात नाही. पाककलेत एखाद्या महिलेला लाजवेल, असा स्वयंपाक काही तृतीयपंथी करतात. मग अशा तृतीयपंथीयांना डबे पुरविण्याची संधी समाज देणार की नाही? आमच्या हातचे जेवण चालणार आहे का? असा प्रश्न किन्नर उपस्थित क रतात.