'आम्ही इथले भाई आहोत', पानवाल्याला खंडणी मागणाऱ्यांना नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 12:19 PM2023-08-06T12:19:31+5:302023-08-06T12:19:43+5:30
हांडेवाडी रोडवरील एका पान शॉपचालकाकडे खंडणी मागणाऱ्यांना नागरिकांनी धाडसाने पकडून दिले
पुणे : कोयते घेऊन आपल्या वस्तीत दहशत पसरविणाऱ्या गुंडांना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी भर रस्त्यात पकडून त्यांची धुलाई केली होती. या पोलिसांचापुणेकरांनी सत्कार केला होता. हांडेवाडी रोडवरील एका पान शॉपचालकाकडे खंडणी मागणाऱ्यांना नागरिकांनी धाडसाने पकडून दिले.
अमर विठ्ठल देशमाने (वय २३, रा. मयूर पार्क, हांडेवाडी चौक) आणि गणेश गौतम कोरडे (वय २२, रा. कुंजीरवाडी, हडपसर) अशी या दोघांची नावे आहेत. याबाबत महंमद नौशाद मुजफ्फर हुसैन (वय २६, रा. हडपसर) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार हांडेवाडी रोडवरील इफ्रा पान शॉप येथे गुरुवारी रात्री साडेआठ वाजता घडला.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांचे पान शॉप आहे. ते दुकानात असताना आरोपी तेथे आले. त्यांनी पैशांची मागणी केली. त्याला फिर्यादीने नकार दिल्यावर त्यांना मारहाण करून गल्ल्यातील दीड हजार रुपये बळजबरीने घेऊन ते पळून जाऊ लागले. तेव्हा फिर्यादी यांनी आरडाओरडा केला. ते ऐकून लोक जमा झाले. तेव्हा अमर देशमाने याने हवेत कोयता फिरवून आम्ही इथले भाई आहोत, जवळ आला तर एकाएकाचे मुडदे पाडतो, असे म्हणून दहशत निर्माण केली. यावेळी उंड्री बीट मार्शल लक्ष्मण काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमलेल्या लोकांच्या मदतीने दोघांना पकडले. तिसऱ्या गुंडाचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलिस निरीक्षक गणेश तोरगल तपास करीत आहेत.